जयपूर - विजय हजारे करंडक स्पर्धेत मुंबईने कर्णधार श्रेयस अय्यरच्या शतकी खेळीच्या जोरावर राजस्थानचा ६७ धावांनी पराभव केला. हा मुंबईचा या स्पर्धेतील एलिट ग्रुप डी मधील सलग चौथा विजय ठरला.
राजस्थानविरुद्धच्या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मागील सामन्यातील द्विशतकवीर पृथ्वी शॉ (३६) आणि यशस्वी जैस्वाल (३८) यांनी मुंबईच्या डावाची चांगली सुरुवात केली. या दोघांनी ७१ धावांची सलामी दिली. या दोघांना शुभम शर्माने बाद केले. यानंतर अय्यरने अप्रतिम फलंदाजी करत शतक झळकावले. त्याला सर्फराज खान (३०) आणि सूर्यकुमार यादव (२९) यांनी चांगली साथ दिली. त्यामुळे मुंबईने ५० षटकांत ७ बाद ३१७ अशी धावसंख्या उभारली.
अय्यरने राजस्थानविरुद्धच्या सामन्यात १०३ चेंडूत ११६ धावांची खेळी केली. यात ११ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. हे त्याचे यंदाच्या स्पर्धेतील सलग दुसरे शतक ठरले. त्याने याआधी महाराष्ट्रविरुद्ध नाबाद १०३ धावांची खेळी केली होती.
मुंबईने विजयासाठी दिलेल्या ३१८ धावांचे उत्तर देताना राजस्थानची अवस्था २ बाद ३२ अशी झाली होती. तेव्हा मनेंदर सिंह (४०) आणि महिपाल लोमरर (४०) यांनी तिसऱ्या विकेटसाठी १०१ धावांची भागीदारी करत राजस्थानचा डाव सावरला. पण हे दोघे बाद झाल्यानंतर राजस्थानचा डाव गडगडला आणि राजस्थानच्या संघाला ४२.२ षटकांत २५० धावांपर्यंत मजल मारता आली. मुंबईकडून शार्दूल ठाकूरने सर्वाधिक ४ विकेट घेतले. तर धवल कुलकर्णीने ३ विकेट घेत त्याला चांगली साथ दिली.
हेही वाचा - 'भारतात असंख्य भाषा बोलल्या जातात... आणि मराठी भाषेचा गोडवा कळत गेला', सचिनचे 'माय मराठी'बद्दल ट्विट
हेही वाचा - India Women vs South Africa Women : दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा