मुंबई - भारतीय क्रिकेट संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत बीसीसीआयने आज महत्वाची माहिती दिली. या दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या संघांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. यात रोहित शर्माची निवड कसोटी मालिकेसाठी करण्यात आली आहे. तर, पहिल्यांदा टी-२० संघात निवड झालेल्या फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला बाहेर व्हावे लागले आहे.
वरुणच्या जागेवर 'हा' गोलंदाज टीम इंडियात...
वरुण चक्रवर्तीच्या खांद्याला दुखापत झाली आहे. यामुळे त्याला टी-20 मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. त्याच्या जागी टी. नटराजनचा टी-20 संघात समावेश करण्यात आला आहे. टी. नटराजनने आयपीएलमध्ये यॉर्कर मारा करत आपली छाप सोडली आहे. त्याने एबी डिव्हिलियर्स सारख्या दिग्गज फलंदाजांला क्लिन बोल्ड केले आहे.
साहाचा निर्णय राखीव, नागरकोटीचा टीम इंडियात प्रवेश लांबणीवर...
वृद्धीमान साहाच्या दोन्ही हॅमस्ट्रींगला दुखापत झाली असून त्याच्याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. कमलेश नागरकोटी यालाही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाता येणार नाही.
शानदार प्रदर्शनानंतर निवड झालेल्या वरुणचे स्वप्न भंगले...
आयपीएलच्या तेराव्या हंगामात वरुण चक्रवर्तीने शानदार गोलंदाजी केली. त्याने आयपीएलच्या १३ सामन्यांत १७ गडी बाद केले आहेत. २० धावांत ५ गडी बाद अशी त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. याच कामगिरीच्या जोरावर वरुणची निवड भारतीय संघात करण्यात आली होती. पण त्यांच्या खांद्याला दुखापत झाली. यामुळे त्याचे भारतीय संघात खेळण्याचे स्वप्न लांबणीवर पडले आहे.
भारताचा सुधारित संघ -
- टी-20 - विराट कोहली (कर्णधार) , शिखर धवन, मयांक अग्रवाल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांडे, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर आणि टी नटराजन.
- एकदिवसीय संघ - विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुबमन गिल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयांक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर आणि संजू सॅमसन.
- कसोटी संघ - विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, शुबमन गिल, वृद्धीमान साहा, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन आणि मोहम्मद सिराज.