नवी दिल्ली - कसोटी सामन्यादरम्यान वर्णद्वेषी वक्तव्याचा बळी ठरल्यामुळे इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरची न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने माफी मागितली आहे. बे ओव्हल मैदानावर इंग्लंड आणि न्यूझीलंड या उभय संघांत खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी एका चाहत्याने आर्चरवर वर्णद्वेषी टीका केली होती.
हेही वाचा - मी संघासाठी 'ओझं', कोणीही माझा मान राखत नाही; ख्रिस गेलची टी-२० स्पर्धेतून माघार
'ही एक भयानक गोष्ट आहे. ज्या देशात अनेक संस्कृती आहेत त्या देशात अशा गोष्टी त्वरित बॅगमध्ये ठेवल्या पाहिजेत. आशा आहे की हे पुन्हा होणार नाही. न्यूझीलंडच्या वतीने मी जोफ्राकडे माफी मागू शकतो. फक्त आमच्या संघाकडूनच नाही, प्रत्येकाकडून ज्याने सामान्यपणे वागावे अशी अपेक्षा असते', असे विल्यमसनने म्हटले आहे.
इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात यजमान न्यूझीलंडने एक डाव आणि ६५ धावांनी दमदार विजय नोंदवला. या सामन्याच्या शेवटच्या दिवशी प्रेक्षकांनी वर्णद्वेषाचे भाष्य केले असल्याचा दावा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने केला. या घटनेबद्दल न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने(एनजेडसी) आर्चरची माफी मागितली आहे.
आर्चरने ट्विटरद्वारे या घटनेचा उल्लेख केला. 'वर्णद्वेषी वागणूकीतून मला थोडा त्रास झाला. हा प्रकार सोडला तर प्रेक्षकांचा पाठिंबा चांगला होता', असे आर्चरने ट्विटमध्ये म्हटले आहे. इंग्लंडच्या डावात २४ वर्षीय फलंदाज आर्चर आणि सॅम करन धावा घेत असताना ही घटना घडली.