नवी दिल्ली - क्रिकेट चाहते अनेक वेळा आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंसोबत 'सेल्फी' किंवा 'ऑटोग्राफ' घेण्यासाठी धडपड करत असतात. मात्र, आता कोरोना व्हायरसच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हे शक्य होणार नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेदरम्यान आणि मार्चमध्ये सुरू होणार्या इंडियन प्रीमियर लीग दरम्यान खेळाडूंना चाहत्यांपासून दूर राहण्याची सूचना देण्यात येऊ शकते.
हेही वाचा - चोप देणाऱ्या फलंदाजाला बाद करण्यासाठी धरले पाय!..पाहा व्हिडिओ
चीनमध्ये उगम झालेल्या कोरोना विषाणूमुळे जगभरात आत्तापर्यंत ४ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तब्बल १०४ देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर चीनबाहेर २८ हजार ६०० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. भारतातही ४७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे.
कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता दक्षिण आफ्रिका संघासह त्यांचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शोएब मांजराही भारत दौऱ्यावर आले आहेत. आफ्रिकेचे खेळाडू क्विंटन डी कॉक आणि फॉफ डू प्लेसिस यांना 'प्रेक्षकांवरील संवाद' आणि 'सेल्फी' घेण्यावर बंदी घालण्यासह आरोग्य-सुरक्षा उपायांची माहिती देण्यात आली आहे.
चीनमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार नियंत्रणात येत असल्याचे दिसून येत आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात दररोज १०० ते १५० जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत होता. मात्र, आता कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. काल(सोमवारी) चीनमध्ये १७ जणांचा मृत्यू झाला. चीननंतर सर्वात जास्त प्रसार इटली देशात झाला आहे. इटलीत ९ हजार पेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर मृतांचा आकडा ५०० पर्यंत पोहचला आहे. इटलीनंतर इराणमध्ये कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आढळून आले आहेत.