डेहराडून - माजी क्रिकेटपटू वसीम जाफरच्या राजीनाम्यानंतर उत्तराखंडच्या क्रिकेट असोसिएशनने (सीएयू) मनीष झा यांच्याकडे मुख्य प्रशिक्षकपदाची सुत्रे दिली आहे. येत्या २० फेब्रुवारीपासून विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी मुख्य प्रशिक्षक हे पद रिक्त ठेवता येणार नसल्याचे सीएयूचे सचिव माहिम वर्मा यांनी सांगितले.
मनीष झा २३ वर्षांखालील संघाच्या प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळत आहेत. इतकेच नाही तर मनीष झा यांनी वसीम जाफरबरोबर काम करून खेळातील अनेक बारकावेही शिकले आहेत.
असोसिएशनने जाफरच्या राजीनाम्याचा अहवाल मागवला
सीएयू आणि वसीम जाफर यांच्यातील वादाचे गांभीर्य लक्षात घेता असोसिएशनने या संदर्भात पुरुष संघ व्यवस्थापक नवनीत मिश्रा यांच्याकडे अहवाल मागविला आहे. तसेच हा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असे असोसिएशनने स्पष्ट केले आहे. सीएयूचे सचिव माहीम वर्मा म्हणाले की, वादाशी संबंधित अहवालासह पुरुष संघाच्या व्यवस्थापकाला बायो बबलच्या उल्लंघनाबाबत विचारणा केली जात आहे. अशा परिस्थितीत या वादाशी संबंधित जबाबदार व्यक्ती / क्रीडा कर्मचाऱ्यांविरूद्ध असोसिएशनकडून योग्य कारवाई केली जाईल, कारण आमच्यासाठी खेळाडूंची सुरक्षा सर्वोच्च आहे.