चेन्नई - भारताचा युवा जलदगती गोलंदाज टी. नटराजनने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दमदार कामगिरीचे प्रदर्शन करत सर्वांची वाहवा मिळवली. मायदेशी परतल्यानंतर नटराजनचे तामिळनाडूमध्ये जोरदार स्वागत झाले. तामिळनाडूत आल्यानंतर नटराजनने पाजहनीच्या मुरुगन मंदिराला भेट दिली.
चिन्नापमपट्टीचा रहिवासी असलेल्या नटराजनने मुरुगन मंदिरात गेल्यानंतर आपले मुंडण केले. त्याने आपल्या यशाचे श्रेय परमेश्वराला दिले आहे. या भेटीदरम्यानचा एक फोटो नटराजनने सोशल मीडियावर शेअर केला. गेल्या वर्षी आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना नटराजन चर्चेत आला होता. भन्नाट यॉर्कर गोलंदाजीमुळे त्याने निवड समितीचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले.
हेही वाचा - चेतेश्वर पुजाराला खेळायचंय आयपीएल, म्हणतो...
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिले दोन सामने गमावल्यानंतर नटराजनला तिसर्या सामन्यात संधी देण्यात आली. त्याने १० षटकांत ७० धावा देऊन २ बळी घेतले. त्यानंतर त्याने टी-२० मध्ये पदार्पण केले. या मालिकेच त्याने ३ सामन्यात ६ विकेट्स घेतल्या. याच दौऱ्यावर त्याने भारतासाठी कसोटी पदार्पण केले.
ब्रिस्बेनच्या गाबा येथे खेळलेला चौथा सामना नटराजनचा कसोटी पदार्पणाचा सामना ठरला. त्याने पहिल्या डावात ७८ धावा देत ३ गडी बाद केले. मात्र, दुसर्या डावात त्याला एकही विकेट मिळाली नाही. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी नटराजनला विश्रांती देण्यात आली आहे.