अबूधाबी - आयपीएल २०२० स्पर्धेतून अचानक माघार घेत भारतात परतलेल्या सुरेश रैनाची चेन्नई सुपर किंग्जने आपल्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून हकालपट्टी केल्याचे वृत्त आहे. रैनासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. तसेच रैनासाठी आता चेन्नईच्या संघाची दारं कायमची बंद झाल्याचं म्हटलं जात आहे.
आयपीएल स्पर्धा खेळण्यासाठी युएईमध्ये दाखल झालेल्या रैनाने चेन्नई संघातील १३ सदस्य कोरोनाबाधित आढळल्यानंतर अचानक स्पर्धेतून माघार घेतली. या दरम्यान, त्याने व्यक्तिगत कारणामुळे मी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. रैनाचे धोनीसोबत वाद झाले. तसेच रैना कोरोनाबाधित आढळल्याने घाबरला होता. अशा विविध चर्चांना ऊत आला. रैनाने माघार घेत भारतात परतणे पसंत केले. यानंतर आता त्याला चेन्नईच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून वगळण्यात आल्याचे वृत्त आहे.
प्रत्येक संघाचा एक व्हॉट्सअॅप ग्रुप आहे. यात संघाशी निगडीत असलेल्या गोष्टी तसेच सूचना पोस्ट केल्या जातात. चेन्नईने आपल्या ग्रुपमधून रैनाला हटवले आहे. यामागचा उद्देश चेन्नईच्या संघाची कोणतीही गोष्ट रैनाला कळू नये, हा असू शकतो. ग्रुपमधून रैनाला बाहेर काढणे म्हणजे त्याच्यासाठी आता संघाची दारं बंद झाल्याचे म्हटलं जात आहे.
दरम्यान, रैनाच्या माघारी परतण्याच्या निर्णयावर चेन्नई सुपर किंग्जचे मालक एन. श्रीनिवासन यांनी नाराजी व्यक्त करत, रैनाच्या डोक्यात यश गेल्याचे म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्याने रैना आणि संघात वाद असल्याचे संकेत होते. यावर स्पष्टीकरण देताना रैनाने, चेन्नईचा संघ माझे कुटुंब आहे आणि धोनी माझ्यासाठी सर्व काही आहे. तसेच माझ्या आणि धोनीमध्ये कोणताही वाद नाही, असे सांगितले होते.
हेही वाचा - तेवढ्या वेळात धोनी संपूर्ण संघाला बाद केला असता; सरफराजची मिस स्टम्पिंग, पाहा व्हिडिओ