नवी दिल्ली - भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी भारत आणि पाकिस्तानमधील खेळाडूंना एकत्रित करून अकरा सदस्यीय संघाची निवड केली आहे. गावस्कर म्हणाले, कदाचित या दोन्ही संघांचे प्रतिनिधित्व करणारा हा सर्वोत्कृष्ट संघ नसेल, पण हे असे खेळाडू आहेत ज्यांना एकत्र खेळायचे आहे. गावस्कर यांनी पाकिस्तानचा माजी कर्णधार रमीझ राजा यांच्यासमवेत शनिवारी सोनी पिक्चर्सच्या स्पोर्ट्स नेटवर्कच्या (एसपीएसएन) कार्यक्रमात ‘सोनी टेन पिट स्टॉप’ वर सहभाग नोंदवला होता.
गावस्कर म्हणाले, “या संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये खूप आनंदाचे वातावरण असेल. खेळाडूंना ड्रेसिंग रुममधून बाहेर काढणे कठीण होईल कारण त्यांना खूप मजा येईल.” गावस्कर यांनी वीरेंद्र सेहवाग आणि अनुभवी पाकिस्तानी फलंदाज हनिफ मोहम्मद यांना आपल्या संघात सलामीची जोडी म्हणून निवडले आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर झहीर अब्बास आणि त्यानंतर सचिन तेंडुलकरला स्थान दिले आहे.
माजी भारतीय फलंदाज गुंडप्पा विश्वनाथ पाचव्या स्थानावर तर कपिल देव सहाव्या क्रमांकावर आहे. त्यांच्याशिवाय वसीम अक्रम, अब्दुल कादिर आणि माजी भारतीय लेगस्पिनर चंद्रशेखर यांचा संघात समावेश आहे.
संघ : हनीफ मोहम्मद, वीरेंद्र सेहवाग, झहीर अब्बास, सचिन तेंडुलकर, गुंडप्पा विश्वनाथ, कपिल देव, इमरान खान, सय्यद किरमानी, वसीम अक्रम, वकार युनूस, अब्दुल कादिर.