हँपशायर - विश्वकरंडक स्पर्धेच्या सराव सामन्यात आज खेळण्यात आलेल्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढतीत स्टीव स्मिथने दमदार पुनरागमन केले. इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात स्मिथने १०२ चेंडूत ११६ धावा करत शानदार शतकी खेळी केली. त्याच्या या शानदार खेळीत ८ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता.
स्मिथच्या या खेळीच्या जोरावर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीस उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने इंग्लंडसमोर ९ गड्यांच्या मोबदल्यात २९८ धावांचे आव्हान ठेवले. स्मिथशिवाय ऑस्ट्रेलियासाठी डेव्हिड वॉर्नरनेही ४३ धावांची खेळी केली.
या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ २८५ धावांवर गारद झाल्याने त्यांना १२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडसाठी जेम्स विन्सने सर्वाधिक ६४, जोस बटलरने ५२ तर ख्रिस वोक्सने ४० धावा केल्या.