नवी दिल्ली - दक्षिण आफ्रिका सरकारने क्रिकेटबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने महिनाभरासाठी क्रिकेट दक्षिण आफ्रिका मंडळ निलंबित केले असून हे मंडळ आपल्या नियंत्रणाखाली घेतले आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, दक्षिण आफ्रिकेच्या स्पोर्ट्स कन्फेडरेशन आणि ऑलिम्पिक समितीने (SASCOC) क्रिकेट दक्षिण आफ्रिकेला लिहिलेल्या पत्रात सीएसए बोर्ड व वरिष्ठ अधिकाऱ्यांना सीएसए प्रशासनातून माघार घेण्याचे निर्देश दिले आहेत.
हा निर्णय आयसीसीच्या नियमाविरूद्ध आहे. कारण क्रिकेटची ही आंतरराष्ट्रीय संस्था कोणत्याही क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारच्या सरकारी हस्तक्षेपाला विरोध करते. हा नियम मोडण्याविरुद्ध आयसीसी आंतरराष्ट्रीय पातळीवर दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटवर बंदी घालू शकते.
क्रिकेट बोर्डातील कारभारात आलेला नकारात्मकपणा आणि काही प्रशासकीय कामांमुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे. दक्षिण आफ्रिकेचे भविष्यातील क्रिकेट अधिक चांगले व्हावे यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती SASCOC चे हंगामी मुख्य कार्यकारी रवी गोवेंदर यांनी दिली.
गोवेंदर म्हणाले, "सीएसए कारभाराशी नुकतीच संबंधित असलेल्या मुद्द्यांबाबत आम्हाला चिंता आहे. आम्ही मंडळाच्या सदस्यांशी भेट घेतली आणि फॉरेन्सिक अहवाल पाहण्याची विनंती केली, जो अद्याप समोर आलेला नाही. आयसीसीनेही चिंता व्यक्त केली आहे. (सीएसएच्या कार्याबद्दल) आणि आम्हाला खात्री आहे की आमचा निर्णय योग्य आहे, आणि आयसीसी हा निर्णय स्वीकारेल."
दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी थबांग मोरोए यांच्या चुकीच्या कारभारामुळे क्रिकेट बोर्डावर संकट ओढावले होते. त्यानंतर मोरोए यांना पदावरुन हटवण्यात आले.