केपटाऊन - दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डामधील भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. या प्रकरणात आता सरकारने हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डावर बंदी येण्याचा धोका निर्माण झाला आहे.
काय आहे प्रकरण -
दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाच्या कारभारात भ्रष्टाचार होत असल्याचे ऑगस्ट महिन्यात समोर आले होते. त्यानंतर क्रिकेट बोर्डाने आपले मुख्य कार्यकारी अधिकारी थबांग मेराई यांची तडकाफडकी हकालपट्टी करत याबाबत एक चौकशी समिती नेमली. समितीने दिलेला चौकशीचा अहवाल सार्वजनिक करण्यास सरकारने दक्षिण आफ्रिका बोर्डाला सांगितले. पण दक्षिण आफ्रिका बोर्डाने याला नकार दिला. यावरून आणखी वाद वाढत गेला. नंतर, आफ्रिकेच्या बोर्डाला झुकावे लागले आणि त्यांनी अखेर तो अहवाल सादर केला. त्यानंतर हा अहवाल सार्वजनिक करण्यात आला आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाच्या त्या अहवालाचा अभ्यास सरकार करत आहे. यामधून त्यांना काही गोष्टी समजल्या आहेत, असे दिसत आहे. त्यामुळे आता सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला आहे. या कारणाने आता दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डावर बंदी येऊ शकते, असे म्हटलं जात आहे.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डावर बंदी आली तर ते खेळाडूंसाठी चांगले नसणार आहे. हा खेळाडूंसाठी मोठा धक्का असणार आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ही दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाची प्रतिमा मलिन होऊ शकते. त्यामुळे आता सरकार नेमका कसा हस्तक्षेप करते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा - व्हायचे होते फलंदाज पण, 'त्या' घटनेने बनला गोलंदाज; अशी आहे तुषार देशपांडेची 'जर्नी'
हेही वाचा - IPL २०२० : दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, 'हा' स्फोटक फलंदाज दुखापतग्रस्त