मुंबई - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघावर टीकेची झोड उठली आहे. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्यासमोर भारताचा दुसरा डाव अवघ्या ३६ धावांत आटोपला. या पराभवानंतर भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी भारतीय संघाच्या मदतीसाठी राहुल द्रविडला ऑस्ट्रेलियात पाठवण्याची विनंती बीसीसीआयकडे केली. या मागणीला राजीव शुक्ला यांनी उत्तर दिले आहे.
काय म्हणाले शुक्ला
एएनआयशी बोलताना शुक्ला यांनी सांगितलं की, 'भारतीय संघाने पहिल्या डावात चांगली कामगिरी केली. यामुळे भारतीय संघाला पहिल्या डावात आघाडीदेखील मिळाली. पण दुसऱ्या डावात आपला डाव कोसळला. हे क्रिकेट आहे. यामध्ये अशा गोष्टी होत असतात. यातून बाहेर यावं लागेल आणि चांगला खेळ करावा लागेल. आपले खेळाडू नक्कीच यातून बाहेर पडून पुनरागमन करू शकतील, यामुळे सद्या कोणीही ऑस्ट्रेलियाला जात नाहीये.'
योग्य रणणिती आखली जात आहे
भारतीय संघाच्या कामगिरीवर सर्वांसोबत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांनी ही देखील चिंता व्यक्त केली आहे. तसेच आपण यामधून कसे सावरु शकतो याबाबत योग्य रणनिती आखली जात आहे. मला खात्री आहे की, पुढील सामन्यात भारतीय संघ चांगली कामगिरी करेल, असे देखील शुक्ला यांनी सांगितलं. त्यांच्या या माहितीवर द्रविड ऑस्ट्रेलियाला जाणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा - बॉक्सिंग डे कसोटी : सामनावीर खेळाडूला मिळणार 'जॉनी मुलघ' पदक
हेही वाचा - मुंबईत नाईट क्लबवर पोलिसांचा छापा; सुरैश रैनासह ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल