कोलकाता - टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा डिसेंबरमध्ये होणार असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने शनिवारी स्पष्ट केले. मात्र, तेथे संघातील खेळाडूंसाठी लागणारा क्वारंटाइन कालावधी कमी करण्यात यावा, अशी अपेक्षा गांगुलीने व्यक्त केली आहे.
डिसेंबरमध्ये भारतीय संघ 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौर्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. फक्त मेलबर्न हे शहर कोरोनाचे 'हॉट स्पॉट' आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना गांगुली म्हणाला, 'हो, आम्ही हा दौरा मंजूर केला आहे. आम्ही डिसेंबरमध्ये तिथे असू. आम्हाला फक्त आशा आहे की आमच्या खेळाडूंसाठी अलग ठेवण्याचे दिवस कमी होतील. कारण आम्हाला इतके दूर जाऊन हॉटेलच्या खोल्यांमध्ये दोन आठवड्यांपर्यंत राहण्याची इच्छा नाही. हे खूप त्रासदायक होईल.''
गांगुली पुढे म्हणाला, ''मी म्हटल्याप्रमाणे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडची अवस्था मेलबर्न वगळता फारच चांगली आहे. हे लक्षात घेऊन आम्ही तिथे दौरा करत आहोत. अशी अपेक्षा आहे की क्वारंटाइनचे दिवस कमी होतील आणि आम्ही क्रिकेटमध्ये परत येऊ शकू.''
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे वेळापत्रक -
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, उभय संघातील पहिला कसोटी सामन्याला 3 डिसेंबरपासून सुरुवात होईल. हा सामना ब्रिस्बेन येथे होणार आहे. त्यानंतर 11 डिसेंबरला अॅडलेड येथे दुसरा, 26 डिसेंबरला मेलबर्न येथे तिसरा आणि 3 जानेवारी 2021मध्ये सिडनी येथे चौथा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे.
भारतीय क्रिकेट संघ विदेशी खेळपट्टीवर आपला पहिला 'डे-नाईट' कसोटी सामना खेळणार आहे. सिडनी क्रिकेट मैदानावर (एससीजी) 3 ते 7 जानेवारी 2021ला हा सामना रंगणार आहे.