लाहोर - पाकिस्तान क्रिकेट संघाने भारतीय संघाचे अनुकरण करायला हवं, असा सल्ला पाकचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने आपल्या संघाला दिला आहे. अख्तरने आपल्या युट्यूब चॅनलवर हा सल्ला दिला आहे. तसेच तो पाकच्या संघाला विराट कोहलीकडून शिकण्याची गरज असल्याचे म्हणाला.
शोएब अख्तर आपल्या युट्यूब चॅनलव्दारे चाहत्यांशी नेहमीच जुळलेला असतो. तो आपल्या चॅनलवर मते मांडत असतो. भारतीय संघाविषयी बोलताना शोएब म्हणाला, 'मी भारतीय संघाची प्रगती पाहिली आहे. पण पाकिस्तान आक्रमक खेळामुळे ओळखला जातो. आम्ही कधीही भेदरट नव्हतो. आपल्या कर्णधाराची तुलना भारतीय कर्णधाराशी करा. कर्णधार अजहर अली आणि प्रशिक्षक मिसबाह उल हक यांनी असा प्रयत्न करायला हवं. विराटच्या संघापेक्षा चांगला संघ होण्यासाठी रोडमॅपची गरज भासते.'
पाकिस्तानचे माजी कर्णधार इम्रान खान यांनी टीम चांगली बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली होती, असेही शोएब म्हणाला. त्यानंतर तो विराट कोहलीची स्तुती करताना म्हणाला, कोहली फिटनेसवेडा आहे आणि त्याची संपूर्ण टीम त्याला फॉलो करते. जर कर्णधारच असा असेल, तर त्याची टीमही तशीच दमदार असणार, त्यामुळे पाकच्या संघाने विराटकडून शिकलं पाहिजे, असे शोएब म्हणाला.
हेही वाचा - टीम इंडियाला धक्का, दीपक चहरची संघात वापसी कठीण
हेही वाचा - पाकिस्तान भारतापेक्षा सुरक्षित, पीसीबी अध्यक्ष एहसान मनी यांची मुक्ताफळे