मुंबई - विश्वकरंडक स्पर्धेनंतर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची निवड करण्यात आली. ही निवड कपिल देव यांच्या नेतृत्वात तीन सदस्यांच्या समितीने केली. पण आता ज्यांनी शास्त्री यांची निवड केली त्यांच्यावरच राजीनामा देण्याची वेळ आली आहे. परस्पर हितसंबंध जपल्याप्रकरणी क्रिकेट सल्लागार समितीतील सदस्या शांता रंगास्वामी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची नियुक्ती करणाऱ्या सल्लागार समितीला (CAC) बीसीसीआयकडून नोटीस बजावण्यात आली आहे. बीसीसीआय लवाद अधिकारी डी. के. जैन यांनी सल्लागार समितीच्या सदस्यांना नोटीस बजावली आहे.
हेही वाचा : रवी शास्त्रींचे पद धोक्यात, कपिल देवच्या CAC ला नोटीस
याविषयी बोलताना, सल्लागार समितीच्या सदस्या रंगास्वामी यांनी सांगितले की, 'आमच्याबाबत परस्पर हितसंबंध जपल्याचे म्हटले जात आहे. मात्र, हे चुकीचे आहे. कारण क्रिकेट सल्लागार समितीची बैठक वर्षातून फक्त दोन ते तीन वेळा होते. त्यामुळे हितसंबंध जपल्याचा मुद्दा उद्भवतच नाही. जर असेच होत राहिले तर एकही क्रिकेटपटू सल्लागार समितीमध्ये काम करु शकत नाही. माझ्याकडे बरेच काम असल्याने, मी क्रिकेट सल्लागार समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.'
दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाच्या नियुक्तीसाठी बीसीसीआयने एक ३ सदस्यीय समिती स्थापन केली होती. या समितीचे अध्यक्षस्थान भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांच्याकडे सोपवण्यात आले होते. तर त्यांच्यासोबत माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांची निवड सदस्य म्हणून करण्यात आली होती.
हेही वाचा : युवीच्या 'चिकना चमेला' लूकवर सानिया मिर्झाचे मजेशीर कमेंट