मुंबई - आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेला भारताने आजपासून प्रारंभ केला. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तब्बल १० महिन्याच्या कालावधीनंतर, फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने भारतीय संघात पुनरागमन केले.
हेही वाचा - शास्त्रींकडून गांधी जयंतीच्या शुभेच्छा, नेटकऱ्यांनी 'ड्राय डे' म्हणत घेतली फिरकी
भारताचा दिग्गज माजी फलंदाज सचिनने अश्विनविषयी आश्वासक मत व्यक्त केले आहे. सचिन म्हणाला, 'आयुष्यात अनेक चढउतार येतात, पण रविचंद्रन अश्विन संघाचा महत्वाचा भाग आहे. तो आघाडीचा गोलंदाज आहे. त्याने केवळ गोलंदाजीतच नाही तर, फलंदाजीतही योगदान दिले आहे.' अश्विनने भारतासाठी नेहमी चांगले प्रदर्शन केले आहे. त्यामुळे तो संघाचा एक महत्वाचा सदस्य असल्याचे सचिनने म्हटले आहे.
अश्विनने आत्तापर्यंत ६५ कसोटी सामन्यात ३४२ बळी घेतले आहेत. पण, विदेशी खेळपट्टीवर त्याच्याऐवजी रवींद्र जडेजाला संधी दिली जाते. ३३ वर्षीय अश्विन सुमारे दहा महिन्यानंतर भारतीय संघातून खेळणार आहे. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये सचिनने भारताला 'फेव्हरिट' मानले आहे.