दुबई - रविवारी मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात जबरदस्त सामना झाला. कदाचित हा आयपीएल इतिहासातील सर्वात रोमांचक आणि बेस्ट सामना होता. कारण या सामन्यात पहिल्यांदाच दोन सुपर ओव्हर पाहायला मिळाली. एका सामन्यात दोन सुपर ओव्हर होण्याची आयपीएलच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ. पंजाबने दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये बाजी मारली. दरम्यान, या सामन्यातील दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला नाही. याचे कारण आता समोर आले आहे.
दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये केरॉन पोलार्डने मुंबई संघाचे नेतृत्व केले. सामना संपल्यानंतर समालोचकाशी बोलताना तो म्हणाला, रोहित शर्माला थोडेसे बरे वाटत नव्हते. त्यांची तबियत खराब असल्यामुळे तो मैदानात आला नाही.
या सामन्यानंतर पुढील सामन्यासाठी आमच्याकडे चार दिवसांचा अवधी आहे. कर्णधार रोहित शर्मा अस्वस्थ आहे. पण चिंता करण्याचे कारण नाही, कारण तो एक फायटर खेळाडू आहे. तो पुढील सामन्यापूर्वी तंदुरुस्त होईल, असेही पोलॉर्डने सांगितलं.
दरम्यान, रविवारी सायंकाळी झालेला मुंबई आणि पंजाब या दोन संघांमधील सामना रोमांचक ठरला. मुंबईने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत १७६ धावा केल्या. तेव्हा पंजाबने देखील प्रत्युत्तरादाखल १७६ धावा केल्या. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये बुमराहने भेदक मारा करत ५ धावा देऊन २ बळी घेतले. या धावसंख्येचा पंजाबच्या मोहम्मद शमीने यशस्वी बचाव केला. शमीने शेवटच्या चेंडूवर एक धावं दिली. सुपर ओव्हर बरोबरीत सुटल्याने एकाच सामन्यात दुसऱ्यांदा सुपर ओव्हर खेळवण्यात आली. त्यावेळी पंजाबकडून ख्रिस जॉर्डनने गोलंदाजी करत ११ धावा दिल्या. १२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ख्रिस गेलने पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर चौकार खेचत मयांक अग्रवालने संघाला विजय मिळवून दिला.