एंटिगा - माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांची भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी फेरनिवड झाली. या नियुक्तीनंतर, शास्त्री यांनी दिलेल्या एका मुलाखतीत भारतीय संघात नवनवीन प्रयोग करत राहणार असल्याचे म्हटले होते. या मुलाखतीनंतर शास्त्रींनी टीम इंडियाच्या सर्वात मुख्य मानल्या जाणाऱया प्रश्नावर भाष्य केले आहे.
प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय क्रिकेट संघातील चौथ्या क्रमांकाच्या प्रश्नावर भाष्य केले. त्यांनी या स्थानासाठी श्रेयस अय्यरचे समर्थन केले आहे. शास्त्री म्हणाले, 'भारतासाठी अय्यर चौथ्या स्थानावर खेळणे चालूच ठेवणार आहे. मागील २ वर्षांमध्ये आम्ही ज्या क्षेत्राकडे लक्ष ठेवले आहे. त्यापैकी युवा खेळाडूंना संधी देणे हे आमचे प्रमुख क्षेत्र आहे.'
टीम इंडिया वेस्ट इंडीज दौऱ्यावर असून या दौऱ्यात भारतीय संघाने टी-२० आणि एकदिवसीय मालिका जिंकली आहे. या एकदिवसीय मालिकेत श्रेयस अय्यरने चौथ्या क्रमांकावर खेळताना दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात अनुक्रमे ७१ आणि ६५ धावा केल्या होत्या.
भारत विरुध्द वेस्ट इंडीज संघामध्ये पहिला कसोटी सामना २२ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट आणि दुसरा सामना ३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या दरम्यान होणार आहे. दरम्यान, कसोटी संघामध्ये अनुभवी स्फोटक फलंदाज ख्रिस गेलचा समावेश संघात करण्यात आलेला नाही.