लंडन - विश्वचषक स्पर्धेत रविवारचे दोन्ही सराव सामने पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आले आहेत. यातील बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना पावसामुळे सुरुच झाला नाही तर दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या सामन्यात फक्त १२.४ षटके खेळण्यात आली.
कार्डिफ येथिल सोफिया गार्डन्स मैदानावर बांगलादेश आणि पाकिस्तान या सामन्यात पावसामुळे नाणेफेकही झाली नाही. तर वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या सामन्यात अवघ्या १२.४ षटकांचा खेळ चालू असताना पावसाचा व्यत्यय आल्याने हाही सामना रद्द करण्यात आला.
प्रथम फलंदाजी करताना १२.४ षटकांमध्ये दक्षिण आफ्रिकेने बिनबाद ९५ धावा केल्या होत्या. यात सलामीवीर हाशिम आमलाने ५१ धावांची अर्धशतकी खेळी केली तर, क्विंटन डी कॉक नाबाद ३७ धावा केल्या.
क्रिकेटचा महाकुंभ समजल्या जाणाऱ्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेला ३० मे पासून इंग्लंडमध्ये सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होईल. तर स्पर्धेचा अंतिम सामना १४ जुलैला लॉडर्सच्या मैदानावर होणार आहे.