ख्राईस्टचर्च - न्यूझीलंड सरकारने पाकिस्तान क्रिकेट संघाला कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करण्यासाठी अंतिम इशारा दिला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान यांनी ही माहिती दिली. पाकिस्तानचे सहा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर सरकारने हे पाऊल उचलले. खान म्हणाले, की पीसीबीला पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी तीन ते चार एसओपीचे उल्लंघन केल्याची माहिती मिळाली आहे.
एका वृत्तानुसार, खान यांनी पाकिस्तानी क्रिकेटपटूंना संदेश दिला आहे. ते क्रिकेटपटूंना म्हणाले, "मी न्यूझीलंड सरकारशी बोललो आहे. त्यांनी आम्हाला सांगितले आहे, की तीन-चार प्रोटोकॉलचे उल्लंघन केले गेले आहे. त्यांनी आपल्याला शेवटचा इशारा दिला आहे. आम्हाला समजले की ही वेळ तुमच्यासाठी कठीण आहे.''
ते म्हणाले, "ही गोष्ट सोपी नाही, परंतु ती देशाच्या दृष्टीने सन्मानाची बाब आहे. हे १४ दिवस तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे, त्यानंतर तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल. त्यांनी मला स्पष्टपणे सांगितले आहे, की जर आणखी काही उल्लंघन झाले तर ते लोकांना परत पाठवतील." पाकिस्तान संघातील काही खेळाडूंनी नियमांचे उल्लंघन केल्याची माहिती न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने गुरुवारी दिली होती.