नवी दिल्ली - पाकिस्तानात आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनावर बीसीसीआयने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद स्वीकारण्यास आमची काहीच हरकत नाही. पण भारतीय संघ या स्पर्धेत भाग घेणार नाही, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. यामुळे पाकिस्तानचे आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद धोक्यात आले आहे.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, 'आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद कुणी स्वीकारावे हा प्रश्न नाही. आमचे म्हणणे एवढेच आहे की पाकिस्तान सोडून इतर त्रयस्थ ठिकाणी ही स्पर्धा खेळली जावी. कारण भारतीय संघ सध्या तरी पाकिस्तानचा दौरा करू शकत नाही.'
२०१८ मध्ये आशिया चषक भारतात होणार होता. मात्र पाकिस्तानी खेळाडूंच्या व्हिसाची समस्येमुळे ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळवण्यात आली. पण या स्पर्धेचे यजमानपद भारताने स्वीकारले होते. पाकिस्तान बोर्डसुद्धा अशाच पद्धतीने त्रयस्थ ठिकाणी स्पर्धा भरवून यजमानपद स्वीकारू शकते, असेही त्या आधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, आशिया चषक क्रिकेट स्पर्धा याच वर्षी होणार आहे. महत्वाची बाब म्हणजे, ही स्पर्धा यंदा टी-२० प्रकारात खेळवली जाणार आहे. ऑस्ट्रेलियात याच वर्षी टी-२० विश्वचषक स्पर्धाही होणार आहे. त्यामुळे विश्व चषकाच्या तयारीच्या अनुषंगाने ही स्पर्धा महत्त्वाची मानली जात आहे.
हेही वाचा - ICC U-१९ World Cup २०२० : ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून टीम इंडिया उपांत्य फेरीत
हेही वाचा - Australian Open : हरलेली बाजी कशी जिंकायची.. हे फेडररने दाखवलं, ५ सेट्सच्या थरारात गाठली उपांत्य फेरी