मुंबई - श्रीलंका क्रिकेट बोर्डाने जुलै महिन्यात तिरंगी मालिका खेळण्याचं निमंत्रण बीसीसीआयला दिलं. यानंतर दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने, बीसीसीआय पुढे ऑगस्ट महिन्यांमध्ये आफ्रिका दौऱ्याचा प्रस्ताव ठेवला. आफ्रिकेच्या या प्रस्तावावर, बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अरूण धुमाळ यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं की, 'कोरोनामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिका अर्ध्यातून रद्द करावी लागली होती. त्यावेळी भविष्यात शक्य झाल्यास आम्ही दक्षिण आफ्रिकेचा दौरा करण्याचा प्रयत्न करु, असे सांगितले होते. पण यात आम्ही ऑगस्ट महिन्यात हा दौरा करुच असा कोणताही शब्द दिलेला नव्हता.'
दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचे हंगामी कार्यकारी अध्यक्ष जॅक फॉल यांनी, भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितलं होतं. यासोबत त्यांनी भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात ३ टी-२० सामने खेळवण्यात येईल, असेही सांगितलं होतं. यावर धुमाळ यांनी बीसीसीआयची भूमिका मांडली.
केंद्र सरकार जोपर्यंत आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी परवानगी देत नाही, तोपर्यंत बीसीसीआय कोणत्याही देशाचा दौऱ्याचा निर्णय घेऊ शकत नाही. जुलै महिन्यात भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर आणि त्यानंतर झिम्बाब्वेला जाणे अपेक्षित आहे. परंतू तो दौराही पूर्ण होईल, याची आम्ही खात्री देऊ शकत नाही, असेही धुमाळ म्हणाले.
श्रीलंका आणि झिम्बाब्वे हे दोन्ही दौरे आयसीसीच्या वेळापत्रकानुसार आहेत. पण, हे दौरे पूर्ण होतील की नाही याबद्दल आमच्या मनात शंका आहे. तर आम्ही ऑगस्ट महिन्यात आफ्रिका दौऱ्याबद्दल कसा निर्णय घेऊ शकतो? असा सवाल धुमाळ यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा - VIDEO : वॉर्नरचा अक्षयच्या 'बाला' गाण्यावर भन्नास डान्स, व्हिडिओ पाहून विराट आले हसू
हेही वाचा - कोरोनाचा फटका.. सरावादरम्यान शौचालयाला जाऊ शकणार नाहीत क्रिकेटपटू!