ख्राईस्टचर्च - फलंदाजांनी पत्करलेल्या हाराकिरीमुळे भारताने न्यूझीलंडविरूद्धची दुसरी कसोटी गमावली आहे. तिसऱ्या दिवशी भारताच्या १३२ धावांचा पाठलाग न्यूझीलंडने सात गडी राखून केला. न्यूझीलंडकडून दुसऱ्या डावात टॉम लॅथमने ५२ तर, टॉम ब्लंडेलने ५५ धावा करत हा विजय नोंदवला आहे. भारताच्या पहिल्या डावाला खिंडार पाडणारा गोलंदाज काईल जेमिसन सामन्याचा मानकरी ठरला.
हेही वाचा - खेलो इंडिया..! द्युतीला दुसरे सुवर्ण तर, मुंबईच्या कीर्ती भोईटेला रौप्यपदक
भारताने तिसऱ्या दिवशी ६ बाद ९० धावांवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली. तेव्हा भारताचे शेवटचे चार फलंदाज अवघ्या ३४ धावांमध्ये माघारी परतले. हनुमा विहारी (९) टीम साऊदीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्याचा झेल वॉटलिंगने टिपला. यानंतर ऋषभ पंत (४), मोहम्मद शमी (५) एकामागोमाग परतले. तेव्हा रवींद्र जडेजाने भारताला शतकी आघाडी मिळवून दिली.
ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात जसप्रीत बुमराह धावबाद झाला आणि भारताचा दुसरा डाव १२४ धावांमध्ये आटोपला. रवींद्र जडेजा १६ धावांवर नाबाद राहिला. न्यूझीलंडकडून दुसऱ्या डावात ट्रेंट बोल्टने सर्वाधिक ४ गडी टिपले. त्याला टीम साऊदीने ३ तर डी ग्रँडहोम आणि वँगर यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद करत चांगली साथ दिली.
तत्पूर्वी, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा भारतीय संघाचा पहिला डाव २४२ धावांवर आटोपला. सलामीवीर पृथ्वी शॉ (५४), चेतेश्वर पुजारा (५४) आणि हनुमा विहारी (५५) यांनी अर्धशतके झळकावली. तिघे वगळता भारताचे अन्य फलंदाज स्वस्तात बाद झाले. त्यानंतर फलंदाजी करण्यास उतरलेल्या न्यूझीलंडने सलामीवीर टॉम लॅथमच्या ५२ आणि काईल जेमिसनच्या ४९ धावांच्या जोरावर पहिल्या डावात सर्वबाद २३५ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक -
- नाणेफेक - न्यूझीलंड
- भारत पहिला डाव - ६३ षटकात सर्वबाद २४२ धावा.
- न्यूझीलंड पहिला डाव - ७३.१ षटकात सर्वबाद २३५ धावा.
- भारत दुसरा डाव - ४६ षटकात सर्वबाद १२४ धावा.
- न्यूझीलंड दुसरा डाव - ३६ षटकात ३ बाद १३२ धावा.