ऑकलंड - ईडन पार्क मैदानावर पावसामुळे व्यत्यय आलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने डकवर्थ-लुईसच्या नियमानुसार वेस्ट इंडीजला पाच गडी राखून पराभूत केले. पावसामुळे हा सामना प्रत्येकी १६ षटकांचा खेळवण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने सात गडी गमावत १८० धावा केल्या. डकवर्थ लुईस नियम लागू झाल्यानंतर न्यूझीलंडला १६ षटकांत १७६ धावांचे लक्ष्य मिळाले. यजमानांनी हे लक्ष्य चार चेंडू राखून पूर्ण केले.
न्यूझीलंडच्या जिमी नीशमने २४ चेंडूत नाबाद ४८ धावा करत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मिचेल सॅटनरने नाबाद ३१ धावांचे योगदान दिले. पदार्पणाचा सामना खेळणार्या डेव्हन कॉनवेने ४१ धावांची खेळी केली.
यापूर्वी विंडीजकडून कर्णधार पोलार्डने नाबाद ७५ धावांची खेळी करत संघाला मजबूत धावसंख्येवर नेऊन ठेवले. पोलार्ड विंडीज संघासाठी अर्धशतक ठोकणारा एकमेव फलंदाज ठरला. त्याच्या संघातील चार खेळाडू दुहेरी आकड्यांपर्यंत पोहोचू शकले.
पोलार्डनंतर सलामीवीर आंद्रे फ्लेचरला ३४ धावा करता आल्या. फॅबियन अॅलनने ३० आणि ब्रेंडन किंगने १३ धावा केल्या. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने चार षटकांत २१ धावा देऊन ५ बळी घेतले. कर्णधार टीम साऊदीला दोन बळी घेता आले.