मुंबई - पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सने प्रमुख गोलंदाज लसिथ मलिंगाला रिलीज केले आहे. श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज मलिंगा आयपीएल सुरू झाल्यापासून मुंबईकडून खेळला आहे. २००९मध्ये तो मुंबईसाठी पहिला सामना खेळला होता. २०१८मध्ये त्याने आयपीएल लिलावातून आपले नाव मागे घेतले होते. त्यानंतर २०१९मध्ये २ कोटींची बोली लावत मुंबईने पुन्हा मलिंगाला संघात घेतले.
३७ वर्षीय मलिंगाने आयपीएलमध्ये १२२ सामने खेळले असून त्यात त्याने १७० बळी टिपले आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक बळींचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे. आयपीएलच्या तेराव्या सत्रातून मलिंगाने वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली होती. त्याच्याबरोबर मुंबईने वेस्ट इंडीजचा अष्टपैलू शेरफेन रुदरफोर्डलाही संघातून रिलीज केले आहे.
आयपीएलच्या १३व्या हंगामाला दोन महिने उलटत नाहीत, तोपर्यंत आयपीएलच्या चौदाव्या हंगामाची तयारी सुरू झाली आहे. बुधवारी सर्व आयपीएलमधील सहभागी फ्रेंचायझींनी त्यांच्या संघात कायम केलेल्या आणि संघातून वगळलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.
हेही वाचा - "ग्रेट भारत'', पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंकडून अजिंक्यसेनेचे कौतुक