नवी दिल्ली - भारताला दोन वेळा वर्ल्डकप मिळवून देणारा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे मार्गदर्शक (मेंटॉर) देवल सहाय यांचे मंगळवारी रांची येथील रुग्णालयात निधन झाले. रांची येथे पहिले टर्फ पिच तयार करण्याचे श्रेय सहाय यांना जाते. ते ७३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी आणि एक मुलगा असा परिवार आहे. सहाय यांचे पहिले नाव देवब्रत होते, परंतु लोत त्यांना देवल म्हणत. श्वास घेण्यात अडचण येऊ लागल्यामुळे सहाय यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना ९ ऑक्टोबरला रुग्णालयातून सोडण्यात आले.
''घरी दहा दिवस घालवल्यानंतर पुन्हा त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्यांचे आजारपण वाढले आणि काल पहाटे तीनच्या सुमारास त्यांचे रांची येथे निधन झाले'', असे सहाय यांचा मुलगा अभिनव आकाश सहाय यांनी एका वृत्तपत्राला सांगितले.
धोनीला दिला होता स्टायपेंड -
रांचीमधील पहिला टर्फ पिच तयार करण्यात विद्युत अभियंता देवल सहाय हे मोलाचे काम करत होते. मेकॉन येथे ते मुख्य अभियंता होते आणि त्यानंतर सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेडमधून (सीसीएल) ते संचालक (कार्मिक) म्हणून निवृत्त झाले. धोनीचे वडीलही मेकॉनमध्ये काम करत होते. सीसीएलमध्ये असताना सहाय यांनी धोनीला स्टायपेंडवर ठेवले होते. शिवाय त्यांनी टर्फ पिचवर खेळण्याची पहिली संधी धोनीला दिली. सहाय यांचे पात्र धोनीच्या बायोपिक बॉलिवुड फिल्म 'एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरी' मध्येही दाखवण्यात आले आहे.