नवी दिल्ली - आयपीएलमधील यशस्वी संघ असलेल्या चेन्नई सुपर किंग्जला यंदा आपली छाप पाडता आलेली नाही. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई संघावर चहूबाजूंनी टीका करण्यात येत आहे. मात्र, या टीकाकारांनी सोशल मीडियावर सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.
काही विकृत मनोवृत्तीच्या नेटकऱ्यांनी धोनीच्या मुलीला सोशल मीडियाच्या पोस्टवरील कमेंट्सच्या माध्यमातून बलात्काराची धमकी दिली आहे. धोनीची मुलगी ५ वर्षांची असून ती सध्या भारतातच आहे. अभिनेत्री नगमा यांनी याचा निषेध करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
नगमा यांनी ट्विट केले, ''देश म्हणून आपण कुठे आहोत? आयपीएलमध्ये केकेआरकडून झालेल्या चेन्नईच्या पराभवानंतर धोनीच्या ५ वर्षाच्या मुलीला लोकांनी धमकावले, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आदरणीय पंतप्रधान, आपल्या देशात काय चालले आहे?'' खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि आमदार सौम्या यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला पराभव पत्कारावा लागला. महत्त्वाच्या क्षणी फलंदाजांनी विकेट फेकल्याने चेन्नईवर पराभवाची नामुष्की ओढवली. कोलकाताने हा सामना १० धावांनी जिंकला. कोलकाताने महत्त्वाच्या क्षणी विकेट घेत चेन्नईला बॅकफूटला ढकलले. कोलकात्याकडून शिवम मवी, वरुण चक्रवर्ती, नागरकोटी, नारायण आणि रसेल यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. तर प्रथम फलंदाजीदरम्यान, ८१ धावा करणारा राहुल त्रिपाठी सामनावीर ठरला.