मुंबई - माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांना अहंकारी म्हटले आहे. एका अॅपवर केलेल्या संवादात कैफने आपली प्रतिक्रिया दिली. कोरोनाविरूद्ध खबरदारी घेण्यासाठी आपण घरीच वेळ घालवत असल्याचेही कैफने सांगितले.
सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून कैफने ग्रेग चॅपेलऐवजी जॉन राईट यांचे नाव घेतले. कैफ म्हणाला, ''ग्रेग चॅपलकडे फलंदाजांची प्रतिभा शोधण्याची क्षमता होती. परंतु त्यांच्याकडे अहंकार होता.''
कारकीर्दीत 13 कसोटी आणि 125 एकदिवसीय सामने खेळलेल्या 39 वर्षीय कैफला गांगुली, राहुल द्रविड, अनिल कुंबळे आणि महेंद्रसिंह धोनी यात सर्वोत्कृष्ट कर्णधार कोण आहे असे विचारले असता त्याने गांगुलीचे नाव घेतले. तर, झहीर खानला त्याने भारताचा सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज म्हणून वर्णन केले. अनिल कुंबळे आणि हरभजन सिंगची कैफने सर्वोत्कृष्ट फिरकी गोलंदाज म्हटले आहे.
कारकीर्द -
कैफने आत्तापर्यंत 13 कसोटी सामने खेळले असून 32.84च्या सरासरीने 624 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 148 अशी आहे. 126 एकदिवसीय सामन्यात त्याने 2753 धावा केल्या असून या प्रकारात त्याची सर्वोच्च धावसंख्या 111 अशी आहे. कैफने टी-20 सामन्यांतही आपले कौशल्य दाखवले. 75 टी-20 सामने खेळताना त्याने 1237 धावा जमवल्या आहेत.