वेलिंग्टन - न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज मार्टिल गुप्टिलने भारताचा हिटमॅन रोहित शर्माचा एक विक्रम मोडीत काढला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यामध्ये ५० चेंडूत ९७ धावा झोडपल्या. याचबरोबर त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० मधील रोहित शर्माचा एक विक्रमही मोडला.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या खेळीत गुप्टीलने ८ षटकार ठोकले. यासह गुप्टील आता टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जास्त षटकार ठोकणारा खेळाडू बनला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड रोहित शर्माच्या नावावर होता. गुप्टीलने त्याला मागे टाकले आहे. गुप्टीलच्या नावावर आता ९६ सामन्यामध्ये १३२ षटकार आहेत. रोहितने १०८ सामन्यामध्ये १२७ षटकार लगावले आहेत. तिसऱ्या स्थानी इंग्लंडचा एऑन मॉर्गन आहे. त्याने ९७ टी -२० सामन्यात ११३ षटकार मारले आहेत.
न्यूझीलंडचा निसटता विजय
न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात ४ धावांनी निसटता विजय मिळवत ५ सामन्याच्या मालिकेत २-० ने आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा न्यूझीलंड संघाने मार्टिन गुप्टील (९७), केन विल्यमसन (५३) आणि जिम्मी निशामच्या आक्रमक ४५ धावांच्या जोरावर निर्धारीत २० षटकात ७ बाद २१९ धावांचा डोंगर उभारला. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या संघाला २१५ धावांपर्यंत मजल मारता आली. मार्कस स्टोयनिसने ३७ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकारांसह ७८ धावांची खेळी करत कडवी झुंज दिली. तळातील डेनिल शम्सने १५ चेंडूत ४१ धावा करत स्टोयनिसला चांगली साथ दिली. पण दोघेही शेवटच्या षटकात मोक्याच्या क्षणी बाद झाले. यामुळे न्यूझीलंड संघाला निसटता विजय मिळवता आला.
हेही वाचा - IND VS ENG ३rd Test : फिरकीच्या जाळ्यात अडकली टीम इंडिया, जो रूटचे ५ विकेट्स
हेही वाचा - विजय हजारे करंडक : द्विशतक झळकावणाऱ्या पृथ्वी शॉच्या नावे अनोखा विक्रम