मुंबई - श्रीलंका क्रिकेट संघाचा स्टार अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा यंदाच्या आयपीएलच्या पहिल्या आठवड्याला मुकण्याची शक्यता आहे. मलिंगा हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. मात्र, आयपीएलपूर्वी होणाऱ्या लंका प्रीमियर लीगमध्ये (एलपीएल) खेळणार असल्याने मलिंगा आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांना अनुपस्थित राहू शकतो.
लंका प्रीमियर लीगचा यंदाचा हा पहिलाच हंगाम असणार आहे. एलपीएलच्या लॉजिस्टिकची अद्याप अंतिम नोंद झालेली नाही. या लीगचा अंतिम सामना 20 सप्टेंबरला होणार आहे. तर, आयपीएल 19 सप्टेंबरपासून सुरू होईल.
युएईला गेल्यानंतरही 72 तास क्वारंटाइन राहणे अनिवार्य आहे. त्यामुळे मलिंगा आयपीएलच्या पहिल्या आठवड्यात संघाबाहेर असू शकतो. मलिंगाने आयपीएलच्या 122 सामन्यात 177 बळी घेतले आहेत. फक्त मलिंगाच नव्हे तर आयपीएलमध्ये प्रथमच खेळणारा इसुरु उडानासुद्धा आयपीएलच्या पहिल्या आठवड्यात संघाबाहेर असून शकतो. तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा भाग आहे.