मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मदत करा, असे आवाहन केले आहे. मोदींच्या या आवाहनला सर्व स्तरातून प्रतिसाद मिळत असून अनेक लोकं मदतीसाठी पुढे येत आहेत. यात मराठमोळा क्रिकेटपटू केदार जाधवच्या नावाचीही भर पडली आहे. केदारने मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरने (एमसीसीआयए) हाती घेतलेल्या संकल्पाला निधी दिला आहे. याशिवाय त्याने मुख्यमंत्री सहायता निधीसाठीही काही मदत केली आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. या प्रयत्नांना हातभार लावण्यासाठी एमसीसीआयएने पुढाकार घेतला आहे. त्यात उद्योग क्षेत्राकडून निधी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या निधीचा वापर आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी करण्यात येत आहे. यात केदार जाधवने आपले योगदान दिले आहे, अशी माहिती ‘एमसीसीआयए’चे महासंचालक प्रशांत गिरबने यांनी दिली.
एमसीसीआयएच्या निधीतून संरक्षक पोशाख, एन ९५ मास्क, व्हेंटिलेटरचा पुरवठा, रुग्णालये आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना केला जात आहे. पहिल्या टप्प्यात व्हेंटिलेटर्स आणि मास्क विभागीय आयुक्तांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.
याविषयी केदारने सांगितलं की, 'सध्याच्या संकट काळात आपण सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे. सरकारने दिलेल्या निर्देशांचे पालन केले पाहिजे. सध्या मीही माझ्या कुटुंबाची काळजी घेत आहे. संचारबंदीमुळे मला कुटुंबीयांना वेळ देण्याची संधी मिळत आहे. वैद्यकीय कर्मचारी करत असलेल्या कामासाठी त्यांना माझा सलाम. या कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी ‘एमसीसीआयए’च्या प्रयत्नांना हातभार लावण्यासाठी माझ्या परीने मदत केली आहे. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीसाठीही काही मदत केली आहे. आपण सर्वानीच आपापल्या परीने पुढे येऊन मदत करावी.'
दरम्यान, केदार व्यतिरिक्त सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, गौतम गंभीर, अजिंक्य रहाणे, बजरंग पुनिया, पी व्ही सिंधू, मेरी कोम, मिताली राज, रोहित शर्मा, विराट कोहली, पूनम यादव, दीप्ती शर्मा आदींनी आर्थिक मदत केली आहे.
तु सिंगल आहेस? चाहत्याच्या प्रश्नांना स्मृतीचे बिनधास्त उत्तर
'आधी फिंच-एबी आणि विराटला बाद करा, मग मला बॉलिंग करण्याची स्वप्न पाहा'