मुंबई - एकदिवसीय विश्वकरंडकासाठी आता काहीच दिवस बाकी राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर क्रिकेटविश्वातील अनेक दिग्गजांनी आपली मते मांडण्यास सुरुवात केली आहे. भारताच्या पहिल्या विश्वकरंडक विजयी संघाचे नेतृत्व करणारे कपिल देव यांनी आपले मत व्यक्त केले आहे. कपिल यांच्या नेतृत्वात भारताने १९८३ला इंग्लंडमध्ये आपला पहिला क्रिकेट विश्वकरंड जिंकला होता.
'विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय क्रिकेट संघ २०१९ च्या आयसीसी वनडे विश्वकरंडक स्पर्धेत सेमीफायनलपर्यंत नक्कीच धडक मारेल, मात्र विश्वविजेता कोण ठरेल याचा अंदाज लावणे अशक्य आहे. भारतासोबत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे संघही सेमीफायनलपर्यंत धडक मारतील असे मत कपिल देव यांनी व्यक्त केले आहे. तसेच भारताच्या वेगवान गोलंदाजांना इंग्लंडच्या खेळपट्ट्या चांगली साथ देतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.
आगामी विश्वकरंडक स्पर्धा इंग्लंड आणि वेल्समध्ये ३० मे पासून सुरू होणार आहे. यात भारताचा पहिला सामना ५ जूनला दक्षिण आफ्रिकेशी होईल.
विश्वकरंडक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेला भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा.