हैदराबाद - भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण आता पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर दिसू शकतो. मीडिया रिपोर्टनुसार, तो श्रीलंका प्रीमियर लीग 2020 मध्ये खेळताना दिसू शकतो. 20 वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीला इरफानने निरोप दिला आहे.
श्रीलंका प्रीमियर लीग टी-20 स्पर्धेचा पहिला हंगाम 28 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. तर, या हंगामाचा अंतिम सामना 20 सप्टेंबरला खेळवण्यात येईल. श्रीलंकेच्या 4 स्टेडियमवर होणाऱ्या या लीगमध्ये एकूण 23 सामने खेळले जातील. या लीगमध्ये भाग घेणार्या पाच संघांची नावे कोलंबो, केन्डी, गाले, डम्बुला आणि जाफना या शहरांच्या नावावरून असणार आहेत. श्रीलंकेत प्रथमच खेळल्या जाणाऱ्या या टी-20 क्रिकेटमध्ये 70 हून अधिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू भाग घेतील.
इरफान पठाण यावर्षी मार्चमध्ये रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये खेळताना दिसला होता. मीडिया रिपोर्टनुसार, इरफान पठाण व्यतिरिक्त न्यूझीलंडचा स्टार क्रिकेटपटू मार्टिन गप्टिलनेही या स्पर्धेत खेळण्यास रस दाखवला आहे. पठाणसाठी या लीगमध्ये खेळणे ही मोठी गोष्ट ठरणार आहे.
इरफानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 29 कसोटी, 120 एकदिवसीय आणि 24 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने कसोटीत 1105 धावा आणि 100 विकेट्स, एकदिवसीय मध्ये 1544 धावा आणि 173 विकेट्स आणि टी-20 मध्ये 172 धावा आणि 28 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल कारकिर्दीबद्दल सांगायचे झाले तर, त्याने 177 सामने खेळले आहेत. यामध्ये तो सनरायझर्स हैदराबाद, राइजिंग पुणे सुपरजायंट्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला आहे.