नवी दिल्ली - आयपीएलच्या तेराव्या सत्रात महेंद्रसिंह धोनीला गोलंदाजी करताना सावधगिरी बाळगली पाहिजे, असा इशारा माजी भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाणने गोलंदाजांना दिला आहे. धोनी नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. मात्र, यूएईमध्ये १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करणार आहे.
इरफान म्हणाला, ''जेव्हा तो चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो तेव्हा तो खेळाचा आनंद घेतो. फलंदाज म्हणून त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी समोर येते. पण या आयपीएलसाठी मी खूप उत्सुक आहे. सर्व गोलंदाजांनी सावध राहिले पाहिजे." मागील वर्षी जुलै महिन्यात झालेल्या विश्वकरंडकाच्या उपांत्य फेरीनंतर, ३९ वर्षीय धोनीने एकही सामना खेळलेला नाही.
दरम्यान, माजी भारतीय फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणनेही धोनीच्या आगामी आयपीएल प्रवासाबाबत भाष्य केले आहे. लक्ष्मण म्हणाला, "पहिली गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांचा असा विश्वास आहे की तो (धोनी) चेन्नई सुपर किंग्जबद्दल खूपच व्यावसायिक आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईचा संघ यशस्वी होण्याचे हे सर्वात मोठे कारण आहे. त्यामुळे तो मैदानात उतरेल आणि सीएसकेला विजेतेपद मिळवून देण्यासाठी सर्वकाही करेल. तो जोपर्यंत खेळेल तोपर्यंत चेन्नईचे नेतृत्व करेल. धोनीचा प्रत्येक क्षण बारकाईने पाहिला जाईल."
धोनीने ९० कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. आतापर्यंत त्याने भारताकडून ३५१ एकदिवसीय सामने आणि ९८ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटी सामन्यांमध्ये भारतासाठी ४ हजार ८७६ धावा, टी-२० मध्ये १० हजार ७७३ एकदिवसीय आणि १ हजार ६१७ धावा केल्या आहेत.