चेन्नई - आयपीएल २०२१ मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्सशी होणार आहे. मुंबईचा संघ सलामीच्या सामन्यात बंगळुरूकडून पराभूत झाला आहे. ते विजयी लय प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर दुसरीकडे कोलकाताने इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वात बलाढ्य सनरायजर्स हैदराबादला नमवलं आहे. यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. उभय संघातील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये होणार असून या सामन्याला ७ वाजून ३० मिनिटांनी सुरूवात होणार आहे.
राणा, त्रिपाठी आणि कार्तिक या भारतीयांवर केकेआरची मदार -
गेल्या २ वर्षांत बाद फेरीची संधी हुकलेला कोलकाताचा संघ या वेळी अधिक समतोल वाटत आहे. नितीश राणा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक आणि वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा या भारतीय खेळाडूंवर कोलकाताची प्रामुख्याने मदार आहे. शुबमन गिलला सातत्याने फलंदाजी करावी लागणार आहे.
मॉर्गनचे कल्पक नेतृत्व -
पॅट कमिन्स, मॉर्गन, रसेल या विदेशी त्रिकुटाला वैयक्तिक कामगिरीवर लक्ष द्यावे लागेल. हरभजन सिंग, वरुण चक्रवर्ती आणि शाकिब अल हसन या प्रभावी फिरकीपटूंमुळे कोलकाता मुंबईवर वरचढ ठरू शकतो. मॉर्गनचे कल्पक नेतृत्व कोलकातासाठी मोलाचे ठरेल.
रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची आशा -
दुसरीकडे सलामीच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा झटपट बाद झाल्यानंतर ख्रिस लीन व सूर्यकुमार यादव यांनी फटकेबाजी करत धावफलक हलता ठेवला होता. त्यानंतर इशान किशनने देखील आपलं योगदान दिले. पण अखेरच्या काही षटकांमध्ये मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना अपयशाचा सामना करावा लागला. हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर मुंबई इंडियन्सने मोक्याच्या क्षणी फलंदाज बाद झाले. त्यामुळे मुंबईला अपेक्षित धावसंख्या उभारता आली नाही.
केरॉन पोलार्ड सहावा गोलंदाज -
हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, केरॉन पोलार्ड यांच्यासह प्रत्येक फलंदाजांना यापुढे चुका करता येणार नाहीत. दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू क्विंटन डी कॉक आजच्या सामन्यात खेळू शकतो. मुंबई इंडियन्सकडून सलामीच्या सामन्यात पाच गोलंदाज वापरण्यात आले. ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, मार्को जेनसेन, कृणाल पांड्या व राहुल चहर यांनी प्रत्येकी चार षटके गोलंदाजी केली. हार्दिक पांड्याला दुखापत होऊ नये यामुळे त्याला गोलंदाजीपासून दूर ठेवण्यात येत आहे. पण केरॉन पोलार्डच्या रुपाने मुंबईकडे सहावा गोलंदाज उपलब्ध आहे.
- कोलकाता नाईट रायडर्सचा संघ -
- इयॉन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, शुबमन गिल, नीतिश राणा, टिम सेफर्ट, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नरेन, कुलदीप यादव, शिवम मावी, लॉकी फर्ग्यूसन, पॅट कमिन्स, कमलेश नागरकोटी, संदीप वारियर, प्रसिद्ध कृष्णा, राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती, शाकिब-अल-हसन, शेल्डन जॅक्सन, वैभव अरोडा, हरभजन सिंग, करुण नायर, बेन कटिंग, वेंकटेश अय्यर आणि पवन नेगी.
- मुंबई इंडियन्सचा संघ -
- रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, अनमोलप्रीत सिंह, ख्रिस लीन, सौरभ तिवारी, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, मोहसिन खान, हार्दिक पांड्या, जयंत यादव, केरॉन पोलार्ड, कृणाल पांड्या, अनुकूल रॉय, ईशान किशन, क्विंटन डी कॉक, आदित्य तारे, एडम मिलने, नाथन कोल्टर नाइल, पीयूष चावला, जेम्स नीशाम, युद्धवीर चरक, मार्को जेनसेन आणि अर्जुन तेंडुलकर.