मुंबई - चेन्नई सुपर किंग्जची आयपीएल २०२१ ची सुरुवात खराब झाली. पहिल्याच सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नईचा ७ गडी राखून पराभव केला. पराभवानंतर चेन्नई संघाला, षटकाची गती संथ राखल्याने १२ लाखांचा दंड झाला. आता आणखी एक संकट चेन्नई संघासमोर आले आहे.
चेन्नईचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी आणि जेसन बेहरेनडोर्फ पंजाबविरुद्धच्या सामन्यात खेळणार नाहीत. हा चेन्नईसाठी मोठा धक्का आहे. कारण, चेन्नईसाठी गोलंदाजी ही दुबळी बाजू आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना आम्ही गोलंदाजांच्या स्वैर माऱ्यामुळे गमावला, अशी कबुली खुद्द कर्णधार धोनीनेच दिली आहे. एनगिडी आणि बेहरेनडोर्फ हे चेन्नईचे प्रमुख गोलंदाज आहे. ते पंजाबविरूद्धच्या सामन्यात खेळू शकणार नसल्याने चेन्नई संघासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. चेन्नई आणि पंजाब यांच्यातील सामना १६ एप्रिलला होणार आहे.
चेन्नईचे प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांनी सांगितलं की, वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी आणि जेसन बेहरेनडोर्फ हे पंजाबविरुद्धच्या सामन्यसाठी उपलब्ध राहणार नाहीत. जोश हेजलवूडला गमावणे हा आमच्यासाठी धक्का ठरला आहे. लवकरच एनगिडी संघात दाखल होईल. त्यानंतर बेहरेनडोर्फ उपलब्ध होईल.
कोरोनामुळे खेळाडूंना काही दिवसांचा क्वारंटाइन कालावधी सुनिश्चित करण्यात आला आहे. लुंगी एनगिडी आणि बेहरेनडोर्फ यांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण झालेला नाही. दरम्यान, जोश हेजलवूडने आयपीएल सुरू होण्याआधीच अचानक स्पर्धेतून माघार घेतली. त्यामुळे त्याचा रिप्लेसमेंट म्हणून चेन्नईने बेहरेनडोर्फला संघात घेतलं आहे.
हेही वाचा - IPL २०२१ : धोनीने पराभवाचे खापर फोडले गोलंदाजांवर, म्हणाला...
हेही वाचा - IPL २०२१ : शिखर धवनने आयपीएलमध्ये रचला इतिहास, असा कारनामा करणारा एकमेव खेळाडू