दुबई - राजस्थानने ठेवलेल्या १७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूची अवस्था १३ षटकात ३ बाद १०२ अशी केविलवाणी झाली होती. यानंतर मैदानात आलेल्या एबी डिव्हिलियर्सने सामन्याची सूत्रे हाती घेत मैदानावर चौफेर फटकेबाजी केली. त्याने उनाडकटने टाकलेल्या १९ व्या षटकात गुरकीरतला सोबत घेत २५ धावा वसूल केल्या. अखेरच्या षटकात विजयासाठी १० धावांची गरज होती. तेव्हा डिव्हिलियर्सने जोफ्रा ऑर्चरच्या चौथ्या चेंडूवर षटकार खेचत आरसीबीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. आरसीबीने हा सामना ७ गडी आणि २ चेंडू राखून जिंकला. डिव्हिलियर्सने २२ चेंडूत १ चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद ५५ धावांची तुफानी खेळी केली. त्याला गुरकीरतने चांगली साथ दिली.
राजस्थानच्या आव्हानचा पाठलाग करताना, बंगळुरूची सुरूवात खराब झाली. अॅरोन फिंच १४ धावांवर बाद झाला. त्याला श्रेयस गोपालने उथप्पाकडे झेल देण्यास भाग पाडले. यानंतर देवदत्त पडिक्कल आणि विराट कोहली या दोघांनी संघाचा डाव सावरला. दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागिदारी केली. पण राहुल तेवतियाने टाकलेल्या तेराव्या षटकात पडीक्कल (३५) उंच टोलावण्याच्या नादात बाद झाला. त्याचा झेल स्टोक्सने टिपला.
चौदाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर आरसीबीली विराटच्या रुपाने मोठा धक्का बसला. कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीवर मारलेला फटका तेवतियाने सीमारेषेजवळ हवेत कसरत करत पकडला. विराटने ३२ चेंडूत ४३ धावा केल्या. यानंतर एबी डिव्हिलियर्स आणि गुरकीरत सिंग मान यांनी धमाकेदार खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. दोघांनी ३९ चेंडूत नाबाद ७७ धावांची भागिदारी केली. डिव्हिलियर्सने २२ चेंडूत १ चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद ५५ धावांची खेळी केली. त्याला गुरकीरतने १९ धावा करत चांगली साथ दिली. परिणामी बंगळुरूने हा सामना ७ गडी राखून जिंकला.
तत्पूर्वी, स्टिव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा रॉबिन उथप्पाला सलामीवीर म्हणून बढती मिळाली. तो बेन स्टोक्ससोबत सलामीला उतरला. दोघांनी राजस्थानला चांगली सुरुवात करून दिली. सहाव्या षटकात दोघांनी ५० धावा फलकावर लावल्या. ख्रिस मॉरिसने बेन स्टोक्सला बाद करत राजस्थानला पहिला धक्का दिला. बेन स्टोक्सने १९ चेंडूत १५ धावा केल्या. त्याचा झेल एबी डिव्हिलियर्सने टिपला. दुसरीकडे उथप्पाने आक्रमक फलंदाजी केली. पण तो चहलच्या गोलंदाजीवर उंच फटका मारताना फसला आणि त्याचा उडालेला झेल फिंचने पकडला. उथप्पाने २२ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकारासह ४१ धावा केल्या. चहलच्या पुढच्याच चेंडूवर संजू सॅमसनही बाद (९) झाला. त्याचा झेल ख्रिस मॉरिसने टिपला. एकवेळ बिनबाद ५० अशी भक्कम स्थितीत असलेल्या राजस्थानची अवस्था ३ बाद ६९ अशी झाली.
कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि जोस बटलर यांनी संघाचा डाव सावरला. दोघांनी १३ व्या षटकात राजस्थानला शंभरी गाठून दिली. तसेच दोघांनी चौथ्या गड्यासाठी ४६ चेंडूत ५८ धावांची भागिदारी रचली. ख्रिस मॉरिसने बटलरचा अडथळा दूर केला. त्याने त्याला सैनीकडे झेल देण्यास भाग पाडलं. बटलरने १ चौकार आणि १ षटकारासह २४ धावा केल्या. स्मिथने एक बाजू पकडून ठेवत अर्धशतक झळकावले. त्याने ३६ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकारासह ५७ धावा केल्या. त्याला तेवतियाने नाबाद १९ धावा करत चांगली साथ दिली. स्मिथ मॉरिसने टाकलेल्या अखेरच्या षटकात बाद झाला. बंगळुरूकडून ख्रिस मॉरिसने चार गडी टिपले. तर चहलने २ गड्यांना माघारी धाडले.