दुबई - आयपीएलच्या तेराव्या हंगामातील साखळी फेरीचे फक्त चार सामने शिल्लक राहिले आहेत. परंतु अद्याप मुंबई वगळता अद्याप कोणताच संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरलेला नाही. शनिवारी एखादा संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरेल अशी आशा होती. पण दोन सामन्यात धक्कादायक निकाल लागले आणि ती आशा धुळीस मिळाली.
शनिवारी काय घडले -
आयपीएल २०२०मध्ये शनिवारी दोन सामने झाले. यातील पहिला सामना दिल्ली विरुद्ध मुंबई यांच्यात झाला. मुंबईने या सामन्यात दिल्लीचा ३४ चेंडू आणि ९ गडी राखून पराभव केला. सायंकाळी दुसरा सामना बंगळुरू आणि हैदराबाद या संघात झाला. या सामन्यात बंगळुरूच्या संघाला हैदराबादने बंगळुरूचा ३५ चेंडू आणि ५ गडी राखून पराभव केला. त्यामुळे आता बंगळुरू आणि दिल्ली हे दोन्ही संघ साधारणत: सारख्याच नेट रन रेटवर असून त्यांच्यासाठी प्ले-ऑफचे गणित अवघड झाले आहे.
बंगळुरू-दिल्ली सामन्यातील विजेता प्ले ऑफचे तिकिट मिळवणार -
दिल्ली आणि बंगळुरू या दोन्ही संघाचे १३ सामन्यांत १४ गुण असून त्यांचा साखळी फेरीतील १ सामना शिल्लक आहे. महत्वाची बाब म्हणजे त्यांचा शिल्लक राहिलेला सामना हा एकमेकांविरोधातच आहे. त्यामुळे सोमवारच्या सामन्यात जो संघ विजेता ठरेल, तो संघ १६ गुणांसह प्ले-ऑफचे तिकीट पक्के करेल.
इतर शर्यतीतील संघाचे होणार काय?
आज २ सामने होणार आहेत. यात चेन्नई विरुद्ध पंजाब आणि कोलकाता विरुद्ध राजस्थान असे सामने होणार आहेत. यातील पंजाबने सामना जिंकला तर त्यांचे आव्हान कायम राहिल. पण चेन्नईने सामना जिंकला तर पंजाबचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.
दुसरीकडे राजस्थान आणि कोलकाता यांच्यातील पराभूत संघाचा यंदाच्या हंगामातील प्रवास संपुष्टात येईल. तसेच मंगळवारी होणारा शेवटचा साखळी सामना हा हैदराबाद आणि मुंबई यांच्यात आहे. या सामन्यात हैदराबादने विजय मिळवला तर ते नेट रनरेटच्या आधारावर प्ले-ऑफसाठी पात्र ठरतील आणि दुसऱ्या एका संघाला स्पर्धेबाहेर व्हावे लागेल.