शारजाह - आयपीएलच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघाने विजयावर शिक्कामोर्तब करण्यात यश मिळविले आहे. सलामीवीर मयांक अग्रवाल, कर्णधार लोकेश राहुल आणि ख्रिस गेल यांनी तडाखेबंद फटकेबाजी केली. या फटकेबाजीने जाबने आरसीबीला ८ गडी राखून पराभूत केले. शेवटच्या चेंडूवर विजयासाठी एक धाव हवी असताना निकोलस पूरनने षटकार मारत विजयश्री खेचून आली.
ख्रिस गेलने आरसीबीच्या गोलंदाजांची धुलाई करत दमदार अर्धशतक झळकावले. कर्णधार लोकेश राहुलने कर्णधाराला साजेशी नाबाद अर्धशतकी खेळी केली. ख्रिस गेलने ५३ तर लोकेश राहुलने नाबाद ६१ धावांची खेळी केली. कर्णधार विराट कोहलीच्या ४८ धावा आणि ख्रिस मॉरिस व इसुरू उडाना या जोडीने डेथ ओव्हरमध्ये केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर आरसीबीने पंजाबसमोर विजयासाठी १७२ धावांचे आव्हान ठेवले आहे. मॉरिस-उडाना जोडीने १३ चेंडूत नाबाद ३५ धावा केल्याने, आरसीबीला सन्मानजनक धावांपर्यंत मजल मारता आली. पडीक्कल, फिंच, डिव्हिलियर्स यासारख्या एकाहून एक फटकेबाजी करणाऱ्या फलंदाजांवर अंकुश लावण्यात पंजाबचे गोलंदाज यशस्वी ठरले.
कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा सलामीवीर जोडी देवदत्त पडीक्कल आणि अॅरोन फिंचने आश्वासक सुरूवात केली. अर्शदीप सिंगने देवदत्त पडीक्कल (१८) पूरमकडे झेल देण्यास भाग पाडले. यानंतर विराट कोहली आणि अॅरोन फिंच यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण पहिला सामना खेळत असलेल्या मुरगन अश्विनने फिंचचा त्रिफाळा उडवत आरसीबीला दुसरा धक्का दिला. त्यानंतर फलंदाजीत बढती मिळालेला वॉशिग्टन सुंदर १३ धावांवर बाद झाला. त्याला मुरगन अश्विनने जॉर्डनकरवी झेलबाद केले.
एका बाजूने गडी बाद होत असताना कर्णधार विराट कोहली मैदानात तग धरुन होता. त्याला शिवम दुबेने चांगली साथ दिली. दोघांनी रवी बिश्र्नोईने टाकलेल्या १५ व्या षटकात १९ धावा वसूल केल्या. यात शिवमने दोन गंगनचुंबी षटकार खेचले. पुढील षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ग्लेन मॅक्सवेलने शिवमचा सोपा कॅच सोडला. गोलंदाज होता ख्रिस जॉर्डन. पण शिवमला जीवदानाचा फायदा उचलता आला नाही. जॉर्डनच्या त्याच षटकातील अखेरच्या चेंडूवर तो बाद झाला. उंचावून मारण्याच्या प्रयत्नात उडलेला झेल केएल राहुलने टिपला. शिवमने १९ चेंडूत २ षटकारासह २३ धावा केल्या.
यानंतर एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहलीचा अखेरच्या षटकांत फटकेबाजी करण्याचा प्लॅन फसला. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर १८ व्या षटकात मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात डिव्हिलियर्स दोन धावा काढून माघारी परतला. त्या पाठोपाठ स्लो बाऊन्सरवर फटका खेळण्याच्या प्रयत्नात विराट यष्टीरक्षक केएल राहुलकडे झेल देऊन माघारी परतला. त्याने ३९ चेंडूत ४८ धावांची खेळी केली. अखेरच्या षटकात ख्रिस मॉरिस आणि इसुरू उडाना या जोडीने फटकेबाजी करत आरसीबीला २० षटकात ६ बाद १७१ धावांचा पल्ला गाठून दिला. मॉरिसने ८ चेंडूत २५ तर उडानाने ५ चेंडूत १० धावा केल्या. पंजाबकडून मोहम्मद शमी आणि मुरगन आश्विनने प्रत्येकी २ तर अर्शदीप सिंह आणि ख्रिस जॉर्डनने प्रत्येकी १-१ बळी घेतला.
- रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा संघ -
- देवदत्त पडीक्कल, अॅरोन फिंच, विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स (यष्टीरक्षक), शिमव दुबे, ख्रिस मॉरिस, इसुरु उदाना, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहल.
- किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ -
- ख्रिस गेल, केएल राहुल (कर्णधार), मयांक अग्रवाल, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, दीपक हुड्डा, ख्रिस जॉर्डन, मोहम्मद शमी, मुरुगन अश्विन, रवि बिश्नोई आणि अर्शदीप सिंह.