नवी दिल्ली - भारताचा गोलंदाज मनप्रीत गोनीने काही दिवसांपूर्वीच निवृत्ती जाहीर केली होती. आता अजून एका क्रिकेटरची मंगळवारी निवृत्ती जाहीर केली आहे. भारतासाठी खेळलेला आंध्रप्रदेशचा माजी कर्णधार वेणुगोपाल राव याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले आहे.
या निवृत्तीची आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशनने माहिती दिली. शिवाय, वेणुगोपाल रावने केलेल्या कामगिरीमुळे असोसिएशनने आभार मानले आहेत. २००० मध्ये अंडर-१९ च्या भारतीय संघात युवराज आणि मोहम्मद कैफसोबत वेणुगोपाल रावचा देखील समावेश होता.
३७ वर्षीय वेणुगोपाल रावने २००५ मध्ये श्रीलंकेविरुद्ध क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. भारतासाठी त्याने १६ एकदिवसीय सामने खेळले आहेत. या सामन्यांत त्याने एका अर्धशतकासह २४.२२ च्या सरासरीने २१८ धावा केल्या आहेत. त्याने शेवटचा एकदिवसीय सामना २००६ रोजी वेस्ट इंडिजविरूद्ध बॅस्टरमध्ये खेळला होता.
त्यानंतर आयपीएलमध्ये वेणुगोपाल रावने एकूण ६५ सामन्यांमध्ये प्रतिनिधीत्व केले आहे. यात तो डेक्कन चार्जर्स ,दिल्ली डेअर डेव्हिलस आणि सनरायजर्स हैदराबाद या संघांकडून खेळला होता. २००९ मध्ये आयपीएलच्या विजेत्या संघातही वेणुगोपालचा समावेश होता.