नवी दिल्ली - वेस्टइंडीजच्या 'अ' संघाविरुध्द धमाकेदार प्रदर्शन करणारा भारताचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलने भारताच्या प्रमुख संघात स्थान न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. आगामी वेस्ट इंडीज दौऱ्यामध्ये भारत आणि वेस्टइंडीजमध्ये तीन टी-20, तीन वनडे आणि तीन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. या दौऱ्यासाठी शुभमन गिलला वगळता अनेक नवख्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
शुभमन म्हणाला, 'रविवारी होणाऱ्या भारतीय संघाच्या घोषणेबाबत मी आतूर होतो. मात्र संघात निवड न झाल्याने मी निराश झालो आहे. पण, मी सध्या सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याकडे लक्ष्य देत आहे आणि निवड समितीला प्रभावित करण्यासाठी मी सर्व प्रयत्न करेन'
शुभमन गिलला किमान एका संघात निवड होईल अशी अपेक्षा होती, परंतु प्रत्यक्षात तसे झाले नाही. विंडीजविरुद्ध 3 ते 8 ऑगस्ट या कालावधीत टी-20 मालिका होईल. त्यानंतर 8 ते 14 ऑगस्ट या कालावधीत तीन एकदिवसीय आणि 22 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत.
वेस्ट इंडीज विरुद्ध झालेल्या मालिकेत गिल हा भारताचा सर्वोत्कृष्ट धावा करणारा खेळाडू ठरला. त्याने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 218 धावा केल्या आणि तो सामनावीर ठरला.