बंगळुरू - आयपीएल फ्रेंचायझी किंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल यंदाच्या आयपीएलची आतुरतेने वाट पाहत आहे. आयपीएलचा तेरावा हंगाम युएईंमध्ये १९ सप्टेंबरपासून होत आहे. मयांकने ट्विटरवर किंग्ज इलेव्हन पंजाबच्या जर्सीमध्ये एक फोटो पोस्ट केला होता, ज्यात त्याने "आता मैदानात उतरण्याची प्रतीक्षा करू शकत नाही", असे लिहिले आहे.
मयांकने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात आशा निर्माण केल्या. येणाऱ्या काळात तो चांगली कामगिरी करेल, असे भारताचा वेगवान गोलंदाज आशिष नेहरा म्हणाला होता. मयांकने आतापर्यंत एकूण ११ कसोटी सामने खेळले आहेत आणि त्यात त्याने ९७४ धावा केल्या आहेत. या सामन्यात त्याने तीन शतके आणि चार अर्धशतके झळकावली आहेत.
एका कार्यक्रमात नेहरा म्हणाला, "मयांकने स्थानिक क्रिकेट आणि भारत-अ संघासाठी खूप चांगली कामगिरी केली आहे. एक-दोन वर्षांपासून घरगुती क्रिकेट खेळणार्या खेळाडूंपैकी तो नाही. त्याने खूप धावा केल्या आहेत आणि मला आशा आहे की वेळेसोबत परिपक्व होईल."
२९ वर्षीय मयांकने न्यूझीलंड दौर्यावर चांगली कामगिरी केली नाही. न्यूझीलंडबरोबर खेळलेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये त्याने अनुक्रमे ३४, ५८, ७ आणि ३ धावा केल्या. या कामगिरीविषयी नेहरा म्हणाला, ''न्यूझीलंडमध्ये फलंदाजी करणे सोपे नाही. माझ्या अनुभवावरून या ग्रहावरील फलंदाजांसाठी सर्वात कठीण स्थान म्हणजे न्यूझीलंड."