मुंबई - दक्षिण आफ्रिकेला पराभवाचे पाणी पाजल्यानंतर टीम इंडिया बांगलादेशविरूद्धच्या अभियानाला प्रारंभ करणार आहे. रविवार ३ नोव्हेंबरपासून भारत विरूद्ध बांगलादेश संघामध्ये तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरूवात होत आहे. टी-२० मालिकेसाठी निवड समितीने कर्णधार विराट कोहलीला विश्रांती दिली असून त्याच्या जागी रोहित शर्माला संघाची कमान देण्यात आली आहे.
हेही वाचा - जेव्हा एक कर्णधार माजी कर्णधाराला भेटतो...
टी-२० आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची गुरुवारी घोषणा करण्यात आली. या मालिकेसाठी निवडलेल्या संघात प्रथमच यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन आणि अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे या खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे.
२०१५ मध्ये कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली संजू सॅमसनने एकमेव आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळला होता. भारत आणि बांगलादेश यांच्यात ३ सामन्यांची टी-२०, तर २ सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. टी-२० मालिकेनंतर होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी कोहलीचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
टी-२० संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पंड्या, युजवेंद्र चहल, राहुल चहर, दीपक चहर, खलील अहमद, शिवम दुबे, शार्दुल ठाकूर.
कसोटी संघ -
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रविंद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, ईशांत शर्मा, शुभमन गिल, रिषभ पंत.