विशाखापट्टणम - भारतीय फलंदाजांनी आपले काम चोख बजावल्यानंतर गोलंदाजांनीही अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा पेश केला. भारतीय फिरकीपुढे दुसऱ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेची अवस्था ३ बाद ३९ अशी झाली. तत्पूर्वी भारताने पहिला डाव ७ बाद ५०२ वर घोषित केला. तेव्हा भारतीय फिरकीपटूंनी आफ्रिकेच्या फलंदाजांचे कंबरडे मोडले.
बऱ्याच कालावधीनंतर संघात परतलेल्या आर अश्विनने इडन मार्क्रम (५) आणि थेनीस डी ब्रुन (४) यांना बाद करत आफ्रिकेला अडचणीत आणले. जाडेजाने नाईट वॉचमन डेन पीटला शून्यावर बाद करत आफ्रिकेची अवस्था ३ बाद ३९ अशी केली. भारताने या सामन्यावर पकड मिळवली आहे.
पहिल्या दिवशी बिनबाद २०२ धावांवरून आजचा खेळ सुरू करताच रोहित व मयांकने जोरदार फटकेबाजी केली. रोहितने २४४ चेंडूंत २३ चौकार व ६ षटकार खेचून १७६ धावा केल्या, तर मयांकने ३७१ चेंडूंत २३ चौकार व ६ षटकारांसह २१५ धावा झोडपल्या. त्यानंतर चेतेश्वर पुजारा (६), कर्णधार विराट कोहली (२०) आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे (१५) यांना मोठी खेळी करता आली नाही. शेवटी भारताने १३६ षटकात ७ बाद ५०२ धावांवर पहिला डाव घोषित केला.