नवी दिल्ली - भारत विरुद्ध बांगलादेश टी २० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला आहे. बांगलादेशच्या मुश्फिकुर रहीमच्या शेवटच्या दोन षटकातील धमाकेदार फलंदाजीमुळे बांगलादेशने ७ गडी राखून विजय मिळवला. तीन सामन्यांच्या मालिकेत बांगलादेश ३-० ने पुढे आहे. मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी होणार आहे.
१४९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्याच चेंडूवर चौकार लगावणारा लिटन दास पहिल्या षटकात माघारी परतला. त्याने ४ चेंडूत ७ धावा केल्या. दमदार फटकेबाजी करणारा मोहम्मद नईमदेखील मोठा फटका खेळताना झेलबाद झाला. २ चौकार आणि १ षटकार लगावत त्याने २८ चेंडूत २६ धावा केल्या. पण शिखर धवनने त्याचा झेल टिपत त्याला माघारी धाडले. पहिले दोन गडी लवकर बाद झाल्यानंतर सौम्या सरकार आणि मुश्फिकुर रहीम यांनी बांगलादेशला सावरले.
सामना रंगतदार अवस्थेत असताना खेळपट्टीवर स्थिरावलेला सौम्या सरकार त्रिफळाचीत झाला. १ चौकार आणि २ षटकार खेचत त्याने ३५ चेंडूत ३९ धावा केल्या. पण मोक्याच्या क्षणी खलीलने त्याचा त्रिफळा उडवला. त्याने मुश्फिकुरने सगळा भार आपल्या खांद्यावर घेत तडाखेबाज खेळी केली. त्याने ४३ चेंडूत ८ चौकार आणि १ षटकार खेचत नाबाद ६० धावा केल्या. मुश्फिकुर ३६ चेंडूत ३८ धावांवर असताना क्रुणाल पांड्याने त्याचा झेल सोडला होता. त्याचा फटका भारताला बसला. भारताकडून चहर, चहल आणि खलीलने १-१ बळी टिपला.
बांगलादेशने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्याच षटकात माघारी परतला. पहिल्या षटकाच्या पहिल्या पाच चेंडूत रोहितने दोन चौकार लगावले. मात्र, शेवटच्या चेंडूवर तो पायचीत झाला. त्याने ५ चेंडूत ९ धावा केल्या. रोहितनंतर के एल राहुलच्या रुपात भारताला दुसरा धक्का बसला. चेंडूचा अंदाज न आल्याने त्याने मारलेला फटका थेट फिल्डरच्या हातात गेला आणि तो झेलबाद झाला. त्याने १७ चेंडूत १५ धावा केल्या. त्यानंतर श्रेयस अय्यर झेलबाद झाला. तर, धाव घेण्यावरून गोंधळ झाल्यानं शिखर धवनच्या रुपाने भारताला चौथा धक्का बसला. तर, या सामन्यात प्रथमच संधी मिळालेला शिवम दुबे एक धाव करून माघारी परतला.