मँचेस्टर - आयसीसी विश्वकंरडक स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना भारत विरुध्द न्यूझीलंड संघामध्ये रंगला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी न्यूझीलंडचा संघ मैदानात उतरला आहे. तेव्हा पहिल्या षटकात सलामीवीर मार्टिन गुप्टिल पायचित असल्याचे अपिल भारताचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारने केले. मात्र, हे अपिल पंचांनी फेटाळून लावले. यावेळी भारताने 'डीआरएस'चा निर्णय घेतला. रिव्ह्यूमध्ये चेंडू स्टम्पबाहेर जात असल्याचे दिसल्यानंतर तिसऱ्या पंचाने मैदानावरील पंचांचा निर्णय कायम ठेवत गुप्टिलला नाबाद ठरवले. यामुळे भारताला एक रिव्ह्यू गमवावा लागला.
विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघ आणि रिव्ह्यू यामध्ये बिनसल्याचे दिसत आहे. या विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाने घेतलेला डीआरएसचे निर्णय चुकल्याचे दिसून आले आहे. भुवनेश्वरच्या आग्रहाने घेतलेल्या डीआरएसला धोनीची सहमती नसल्याचे दिसून येत होते. मात्र, कोहलीने भुवीच्या आग्रहाने डीआरएसचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय चुकल्याचे दिसून आले.
यापूर्वी भारताने इंग्लडंविरुद्ध साखळी फेरीत झालेल्या सामन्यात जेसन रॉयच्या झेलबादचे अपिल केले होते. पंचांनी अपिल फेटाळून लावल्यानंतर भारताने रिव्ह्यू घेतला नाही. मात्र, टीव्ही रिप्लेमध्ये चेंडू बॅटची कड घेऊन गेल्याचे दिसत होते. महत्त्वाचे म्हणजे, भारताला तो सामना गमवावा लागला होता.