हैदराबाद - भारतीय संघाने तुल्यबळ ऑस्ट्रेलिया संघाचा ३ सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत २-१ ने पराभव केला. भारतीय संघ यानंतर न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. २४ जानेवारीपासून सुरू होणारा न्यूझीलंड दौरा भारतीय संघासाठी सोपा नाही. कारण, न्यूझीलंडचा संघ मायदेशात नेहमीच चांगली कामगिरी करताना दिसतो. यामुळे भारत-न्यूझीलंड यांच्यात कडवी झुंज क्रिकेट चाहत्यांना पाहता येणार आहे. दरम्यान, न्यूझीलंड दौरा सुरू होण्याआधी आम्ही तुम्हाला किवीचे धोकादायक खेळाडूविषयी माहिती देणार आहोत. जे टीम इंडियाच्या विजयात अडचणी निर्माण करु शकतात. वाचा कोण आहेत ते खेळाडू...
केन विल्यमसन -
'कूल' कर्णधार केन विल्यमसनवर न्यूझीलंडचा भार आहे. तो संपूर्ण लयीत असून तो सातत्याने धावा करत आहे. भारतीय संघाला याच्याविरुद्ध खास रणणिती आखाण्याची गरज आहे.
मार्टिन गुप्टील -
न्यूझीलंडचा सलामी फलंदाज मार्टिन गुप्टील जगात धडाकेबाज फलंदाज म्हणून ओळखला जातो. भारतीय गोलंदाजांना याला पावर प्ले मध्ये बाद करण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण गुप्टीलचा जम बसला की, तो सामन्याचे चित्रच पालटून टाकू शकतो.
टिम साऊदी -
टीम साऊदी न्यूझीलंडचा अनुभवी गोलंदाज असून मायदेशात खेळताना त्याची कामगिरी नेहमीच उंचावते. भारतीय फलंदाजांना याच्याविरुद्ध खेळताना तंत्रशुध्द फलंदाजी करावी लागणार आहे. साऊदी आपल्या स्विंग आणि वेगाच्या जोरावर भारताच्या सर्वोत्तम फलंदाजालाही अडचणीत आणू शकतो.
कॉलिन मुन्रो -
न्यूझीलंडचा स्फोटक सलामीवीर कॉलिन मुन्रोपासूनही भारताला सावध रहावं लागेल. तो संघाला स्फोटक सुरूवात करुन देण्यात माहिर आहे. भारतीय गोलंदाजाला याला लवकर बाद करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. मुन्रोने टी-२० क्रिकेटमध्ये ४ शतकं केली असून त्याचा स्ट्राईक रेट १४५ इतका आहे.
कॉलिन डी ग्रँडहोम -
अष्टपैलू कॉलिन मोक्याच्या क्षणी फलंदाजी असो की गोलंदाजी त्यात तो सरस कामगिरी करुन दाखवतो. यामुळे कॉलिनही भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरु शकतो.