हॅमिल्टन - भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा टी-२० सामना रोमांचक ठरला. भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत २० षटकात ५ बाद १७९ धावा केल्या आणि न्यूझीलंड संघाला विजयासाठी १८० धावांचे लक्ष्य मिळाले. यजमान न्यूझीलंडने सुरुवात देखील चांगली केली. पण मध्यावर त्यांचा डाव कोसळला. तेव्हा कर्णधार केन विल्यम्सनने डाव सावरला. पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. न्यूझीलंडला शेवटच्या षटकात ६ चेंडूत ९ धावांची गरज होती. तेव्हा मोहम्मद शमीच्या अव्वल गोलंदाजीमुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.
शमीने शेवटच्या षटकातील ६ चेंडूत सामना टाय केला. सुपर ओव्हरमध्ये भलेही रोहित शर्माने, दोन चेंडूत सलग दोन षटकार ठोकत सामना जिंकून दिला. मात्र, शमीची गोलंदाजी नेहमीच क्रिकेट चाहत्यांच्या आठवणीत राहिल. वाचा शमीने टाकलेल्या शेवटच्या षटकाचा थरार...
मोहम्मद शमी २० वे षटक घेऊन गोलंदाजीसाठी आला. त्याने पहिला चेंडू यार्कर टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो चेंडू थेट फुलटॉस गेला आणि रॉस टेलरने या चेंडूवर षटकार ठोकत ६ धावा वसूल केल्या. न्यूझीलंडला विजयासाठी ५ चेंडूत ३ धावांची गरज होती. शमीने तेव्हा दुसरा चेंडू यार्कर लाईनवर टाकला. टेलरला या चेंडूवर एक धाव मिळाली. शमीने तिसरा चेंडू बाऊंसर टाकला हा चेंडू कर्णधार केन विल्यम्सनला खेळता आला नाही. तो त्या चेंडूला कट करण्याच्या नादात बॅटची कड घेऊन गेलेला झेल यष्टीरक्षक केएल राहुलने घेतला.
विल्यम्सन बाद झाल्यानंतर सीफर्ट फलंदाजीसाठी आला. शमीने चौथा चेंडू शॉर्ट टाकला या चेंडूवर सीफर्टला एकही धाव घेता आली नाही. पाचवा चेंडूही शमीने शॉर्ट टाकला. तेव्हा तो चेंडू सीफर्डच्या पॅडला लागला आणि फलंदाजांनी एक धाव घेतली. शेवटच्या चेंडूवर न्यूझीलंडला विजयासाठी १ धावेची गरज होती. तेव्हा शमीने रॉस टेलरला ब्लॉकहोल चेंडू टाकत क्लिन बोल्ड केले आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.
जसप्रीत बुमराहने टाकलेल्या सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडने १७ धावा करत भारतासमोर विजयासाठी १८ धावांचे लक्ष्य ठेवले. तेव्हा भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल या जोडीने ऐतिहासिक विजयाची नोंद केली. भारताला एकवेळ शेवटच्या दोन चेंडूत विजयासाठी १० धावांची गरज होती. तेव्हा रोहित शर्माने सलग दोन चेंडूंवर उत्तुंग षटकार ठोकून रोमांचक विजय मिळवून दिला. दरम्यान, भारताने या 'सुपर' विजयासह ५ सामन्याच्या टी-२० मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. तसेच भारताने पहिल्यांदाच न्यूझीलंडला त्यांच्या घरच्या मैदानावर टी-२० मालिकेत पराभूत केले आहे.
हेही वाचा - IND VS NZ : सुपर ओव्हरमध्ये रोहितचे २ चेंडूवर २ षटकार, टीम इंडियाचा ऐतिहासिक मालिका विजय
हेही वाचा - सुपर ओव्हरचा थरार... रोहितच्या मनात काय सुरू होते, वाचा...