चेन्नई - इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा दारूण पराभव झाला. या पराभवानंतर भारतीय संघाच्या निवडीबाबत चर्चांना ऊत आला. अनेकांनी अनुभवी कुलदीप यादवचा समावेश संघात न झाल्याने, आश्चर्य व्यक्त केले. आता दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी कुलदीपचा समावेश भारतीय संघात करण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. तर दुसरीकडे भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी दुसऱ्या कसोटीसाठी वॉशिग्टन सुंदरला पाठिंबा देत त्याचे कौतूक केले आहे.
सुनील गावसकर म्हणाले की, 'पहिल्या कसोटीनंतर झालेली पत्रकार परिषद पाहता, दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात एकमात्र बदल होईल असे मला वाटते. कारण सध्यातरी कोणतेही मोठे बदल करण्याची गरज नसल्याचेही मला वाटते. सध्याचा संघ उत्तम आहे.'
पहिल्या सामन्यात पराभव झाला, असे काही वेळा होत असते. पण या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरने ज्या पद्धतीने फलंदाजी केली ती नक्कीच कौतुकास्पद आहे. त्याला फक्त आणखी जास्त गोलंदाजी करू द्यायला हवी, असेही गावसकर म्हणाले.
अश्विनसोबत गोलंदाजी करुन वॉशिंग्टनला खूप शिकता येईल आणि त्याच्या गोलंदाजीत आणखी सुधारणा होईल. त्यामुळेच दुसऱ्या कसोटीत वॉशिंग्टन सुंदरची निवड निश्चित आहे. संघातून कोण बाहेर जाईल? हे पाहण्यासाठी आपल्याला थोडी वाट पाहावी लागेल, असे देखील सुनील गावस्कर म्हणाले. दरम्यान, उभय संघातील दुसरा सामना चेन्नईमध्येच होणार आहे. या सामन्याला १३ फेब्रुवारीपासून सुरूवात होईल.
हेही वाचा - इंग्लंडच्या फलंदाजांवर विराट नाराज...जाणून घ्या कारण
हेही वाचा - ''विकेटकीपिंगच्या बाबतीत पंत पाळण्यातल्या मुलासारखा'', दिग्गज क्रिकेटपटूने दिले मत