अहमदाबाद - इशान किशनने पदार्पणाच्या सामन्यात ३२ चेंडूत ५६ धावांची ताबडतोड खेळी करत मैदानातील प्रेक्षकांचं मन जिंकलं. त्याला या खेळीमुळे सामनावीरच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. तेव्हा त्यानं पुरस्कार सोहळ्यात आपल्या कृतीने असंख्य क्रिकेटप्रेमींचेही मन जिंकलं.
पुरस्कार सोहळ्यात बोलताना किशन म्हणाला, माझ्या प्रशिक्षकांच्या वडिलांचं काही दिवसांपूर्वीच निधन झाले. आजची ही खेळी त्यांच्यासाठी होती. मला स्वतःला सिद्ध करायचे होते. कारण माझ्या वडिलांसाठी तुला किमान अर्धशतक तरी झळकवावं लागेल, असे प्रशिक्षक मला म्हणाले होते. त्यामुळे मी हा पुरस्कार त्यांना समर्पित करतो.
किशनने पदार्पणाच्या सामन्यात मिळालेला सामनावीरचा पुरस्कार आपल्या प्रशिक्षकांच्या वडिलांच्या नावे समर्पित केला. त्याच्या या निर्णयाचे सोशल मीडियातून कौतुक होत आहे.
भारताने असा जिंकला सामना -
दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडने भारतीय संघाला विजयासाठी १६५ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान भारतीय संघाने ३ गड्याच्या मोबदल्यात १७.५ षटकात पूर्ण केले. या सामन्यात इशान किशनने सलामीला येत ३२ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारासह ५६ धावांची दमदार खेळी केली. यानंतर विराटने नाबाद ७३ धावा करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारतीय संघाने या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. उभय संघातील तिसरा सामना १६ तारखेला होणार आहे.
हेही वाचा - WI vs SL : श्रीलंका पुन्हा पराभूत; विंडीजचा ५ गडी राखून विजय, मालिकेवरही कब्जा
हेही वाचा -वचपा काढला! इंग्लंडला दणका; मालिकेत १-१ बरोबरी, दुसऱ्या टी-२०त भारताचा ७ गडी राखून विजय